सहकार धनिकाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:15+5:302021-08-29T04:24:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सहकार आणि शेती मोडून धनिकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. कामगार, शेती, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहकार आणि शेती मोडून धनिकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. कामगार, शेती, सहकार चळवळ टिकविण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन प्रा. आनंद मेणसे यांनी केले.
अखिल भारतीय किसन संघर्षं समन्वय समितीच्या वतीने शनिवारी मुस्लिम बोर्डिंगमध्ये आयोजित ‘सहकार वाचवा’ परिषदेत ते बोलत होते. ‘गोकुळ’चे चेअरमन विश्वास पाटील, संपतबापू पाटील, बाबूराव कदम, नामदेव गावडे, शुभांगी पाटील, वसंत पाटील, बाबासो नदाफ उपस्थित होते
मेणसे म्हणाले, स्वातंत्र्य चळवळ आणि सहकार चळवळ यांचा एकमेकींशी संबध आहे. महात्मा गांधी यांनी चळवळीबरोबर विधायक काम करा असे आदेश दिले होते. विधायक म्हणजेच सहकार होय; पण आताच्या सरकारला याचा विसर पडला आहे. सहकार मोडीत काढला जात आहे, असा आरोपही मेणसे यांनी केला.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीचा मालक नोकर झाला आहे. आत्ताचे सत्ताधारी म्हणजे त्या वेळचे जनसंघ होत, असे सांगून मेणसे यांनी चुकीच्या पद्धतीने शेतकरी कायदे करून समाजव्यवस्था मोडण्याचा सत्ताधारी लोकांचा घाट आहे. सहकार ही संकल्पना टिकविण्यासाठी तळापर्यंत काम पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौकट
कृषी कायदे मागे घेण्याचा ठराव
केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. ते ताबडतोबीने मागे घ्यावेत, असा ठराव विधिमंडळात करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव परिषदेत मांडण्यात आला.