सरकारची कर्जमाफीची तयारी सुरू

By admin | Published: April 13, 2017 06:53 PM2017-04-13T18:53:56+5:302017-04-13T18:56:54+5:30

महसूलमंत्री पाटील यांची माहिती : शेतकरी सक्षम करण्यावर भर

Government's willingness to apologize | सरकारची कर्जमाफीची तयारी सुरू

सरकारची कर्जमाफीची तयारी सुरू

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ : राज्यामध्ये कृषी कर्जाचा आढावा सुरू करण्यात आला असून, शासनाने कर्जमाफीची तयारी सुरू केली आहे. कर्जमाफी देतानाच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा शासनाचा विचार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुुरुवारी येथे जाहीर केले.

महसूलमंत्री पाटील म्हणाले, ‘या वर्षी शासनाने ५५०० रुपये दराने ३० लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली आहे. शेतकऱ्याला उत्पादन वाढीसाठी सर्व सुविधा देण्यात येतीलच; पण त्याबरोबरच उत्पादित मालाला चांगला दरही देण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून जाणारे हे सरकार असून, त्याच भावनेतून आम्ही कर्जमाफीचा विचार गांभीर्याने करीत आहोत. प्रत्येकाला घर देण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, विविध १२०० आजारांवर मोफत उपचार करणारी ‘महात्मा जोतीराव फुले आरोग्य योजना’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांची व अभियांत्रिकी व वैद्यकशास्त्रासारख्या अभ्यासक्रमाला जाणाऱ्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांची ५० टक्के फी शासन भरणार आहे. शासनाकडे विकासासाठीच्या निधीची कमतरता नाही; पण हा विकास तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.’

भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथे अनेक वर्षांपासून मागणी असणाऱ्या आणि २ कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा सत्कार समारंभ आणि कृतज्ञता स्नेहमेळावा यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर. व्ही. देसाई होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर), बिद्री साखर कारखान्याचे प्रशासकीय संचालक नाथाजी पाटील, पंचायत समिती भुदरगडच्या सदस्या आक्काताई नलवडे, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, सरपंच रणजित देसाई, कोल्हापूर जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रवीण नलवडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा व विविध समित्यांचे सभापती, पंचायत समितीचे सदस्य यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

२८ योजनांचा निधी पडून

मंत्री पाटील म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांमध्ये शासनाने केलेल्या विविध २८ योजनांचा निधी खर्च होऊ शकला नाही. कारण त्या योजनाच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अगदी शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी काम करा.

सोनवडे घाटासाठी १२९ कोटी

सोनवडे घाटरस्त्यासाठी १२९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, हे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. कोल्हापूर-गारगोटी रस्त्याचे रुंदीकरण केल्याने प्रवासातील हा वेळही वाचणार आहे.

बुलेट ट्रेनचा प्रकल्प
एक लाख कोटी रुपये खर्चून बुलेट ट्रेनचा प्रकल्पही शासनाने हाती घेतल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथे गुरुवारी महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकामांचा व जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा झाला. त्यानंतर झालेल्या सभेत महसूलमंत्री पाटील यांनी राज्य सरकारने हाती घेतलेल्या योजनांची माहिती दिली. त्यावेळी व्यासपीठावर नाथाजी पाटील, योगेश परुळेकर, सर्जेराव पाटील-पेरीडकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, आर. व्ही. देसाई, अध्यक्षा शौमिका महाडिक, आक्काताई नलवडे, बाबा देसाई व अंबरीश घाटगे, आदी उपस्थित होते.

Web Title: Government's willingness to apologize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.