राज्यपालांकडून नऊ जणांची सिनेटवर नियुक्ती; सांगलीच्या पाचजणांना संधी, तर कोल्हापूर, साताराचे प्रत्येकी दोघे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 01:28 PM2023-01-11T13:28:50+5:302023-01-11T13:29:19+5:30
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पाठवले पत्र
कोल्हापूर : राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नऊ जणांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पाच जानेवारीला त्यांनी याबाबतचे पत्र शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पाठवले आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे तिघे, सांगलीचे चौघे तर साताऱ्याच्या दोघांचा समावेश आहे.
शनिल फत्तेसिंह देसाई महागावकर रा साईक्स एक्सटेशन, घनश्याम दीक्षित रा. आर. के. नगर कोल्हापूर, काव्यश्री शरद नलवडे रा. जयसिंगपूर, श्रीनिवास गायकवाड विश्रामबाग, संजय परमणे इन्कम टॅक्स ऑफिसजवळ, डॉ. मनोजकुमार पाटील शिरगाव, ता. तासगाव, विनिता तेलंग तेलंगवाडा हरिपूर, सारंग कोल्हापुरे रा. सदरबझार व सुजीत शेडगे रा. शनिवार पेठ सातारा अशी या नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत.
डॉ. दीक्षित हे ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ असून त्यांनी विद्यापीठातील वनस्पती विभागाचे प्रमुख होते. शनिल देसाई यांची शेती असून रुग्णालयांना लागणारी उपकरणे पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ते नातेवाईक आहेत. सांगलीचे परमणे हे अभाविपचे कार्यकर्ते आहेत.
काव्यश्री नलवडे या उदगावमधील अकिवाटे औद्योगिक वसाहतीत उद्योजक आहेत. मागील तीन वर्षांपासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगली शहराच्या संपर्कप्रमुख म्हणून काम करतात. साताऱ्याचे शेडगे शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांब शिक्षक आहेत. सारंग कोल्हापुरे हे नामवंत सीए आहेत.