प्रशासक नेमणुकीने कारभारी गटात चलबिचल
By admin | Published: November 17, 2014 11:40 PM2014-11-17T23:40:45+5:302014-11-17T23:54:37+5:30
वडगाव बाजार समिती : सुमारे ६५ गावांचे कार्यक्षेत्र असणारी मोठी बाजारपेठ
सुहास जाधव ल्ल पेठवडगाव तालुक्यातील सुमारे ६५ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या व मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक झाली. त्यामुळे एकहाती कारभार करणाऱ्या गटात चलबिचलता पसरली आहे. मात्र, सध्या तरी तडजोडीने बिनविरोध की, निवडणूक लागणार याकडे तालुक्याचे लक्ष आहे. वडगाव ही परिसराची उतारपेठ आहे. येथे धान्य, जनावरांचा बाजार, भाजीपाला यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर-सांगलीसह देशातील शेतकरी, व्यापारी, गाय, म्हैस, बैल खरेदी-विक्रीसाठी वडगाव येथे येतात. या बाजार समितीची उलाढाल शंभर कोटींच्यावर आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०१३ला संपली. त्यांना तीनवेळा मुदतवाढ मिळाली आहे. राज्यातील बाजार समित्या बरखास्तीच्या घोषणेचा फटका या समितीला बसला. बाजार समिती व्यापारी, शेतकरी यांची असली, तरी यावर एकहाती वर्चस्व आमदार महादेवराव महाडिक यांचेच आहे. त्यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची मदत घेतली आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अन्य पक्ष, विविध गट यांनाही प्रतिनिधित्व दिलेले आहे. त्यामुळे बाजार समितीवर सर्व पक्षीय चेहरा आहे. वडगाव बाजार समित्यांची सदस्य संख्या १९ आहे, तर दोन सदस्य स्वीकृत, असे २१ जणांचे संचालक मंडळ आहे. सत्तेत इतरांना भागीदारी दाखविण्यासाठी तब्बल दहा स्वीकृत सदस्यांची नेमणूक केली आहे. वडगावच्या जनावरांच्या बाजार विकासासाठी महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक विकास प्रकल्पांतर्गत जागतिक बॅँकेच्या सहकार्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. यासाठी एक कोटी रुपये मिळाले आहेत. यातून आधुनिक मॉडेल ‘जनावरांचा बाजार’ करण्याचे काम संचालक मंडळाने घेतले आहे. भाजपला कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची सहकारातील मक्तेदारी मोडण्यासाठी राज्यातील बाजार समित्या बरखास्तीचा निर्णय तत्काळ घेतल्याची चर्चा आहे. मात्र, या धोरणाचा फटका या बाजार समितीला बसण्याची शक्यता कमी आहे. कॉँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक, त्यांचाच मुलगा भाजपचे आमदार अमल महाडिक आहेत. त्यामुळे तडजोडीतून बिनविरोध की, नव्याने समीकरणे तयार होऊन निवडणूक लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर नव्यांना संधी मिळणार की, जुन्या संचालकांवर नेते विश्वास ठेवणार याकडे सभासदांचे लक्ष आहे.