महाराष्ट्र-कर्नाटकचे राज्यपाल शुक्रवारी कोल्हापुरात, सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक
By संदीप आडनाईक | Published: November 1, 2022 10:56 PM2022-11-01T22:56:35+5:302022-11-01T22:57:06+5:30
Governor of Maharashtra-Karnataka : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत. सीमावाद वगळून विविध प्रशासकीय समस्यांची चर्चा करण्यासाठी रेसिडेन्सी क्लबमध्ये होणारी ही बैठक सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेले अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, कोरोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी, अशा विविध समस्यांसंदर्भात कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा (विजापूर), कलबुर्गी (गुलबर्गा) आणि बीदर जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरचे जिल्हाधिकारी या बैठकीत चर्चा करणार आहेत.
सीमाभागातील जिल्ह्यांतील समस्यांसंदर्भात राजभवनामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ही बैठक बोलावली असून, माध्यम प्रतिनिधींसह कोणत्याही राजकीय व्यक्तींना येथे प्रवेश देण्यात येणार नाही. या बैठकीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी प्रशासकीय पातळीवर घेतला. या बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंचीचाही विषय चर्चेत मांडणार असल्याचे रेखावार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २००५, २००६, २०१९ आणि २०२१ या वर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आलेल्या महापुराला अलमट्टी धरणातील पाणीपातळी कारणीभूत होती. या धरणाची पाणीपातळी ५१७ वरून ५१७.५० मीटरपर्यंत नियंत्रित ठेवण्याचे ठरले. मात्र, ते अनेकदा पाळले गेले नाही. यावर्षीची पाणीपातळी ५१९ मीटरपर्यंत होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्वीचीच पाणीपातळी कायम ठेवण्याचा आग्रह या बैठकीत धरण्यात येणार आहे, असेही रेखावार यांनी सांगितले.
कर्नाटकचे राज्यपाल अंबाबाईचे घेणार दर्शन
दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा दौरा जाहीर झाला असून ते ३ नोव्हेंबर रोजी रात्री कोल्हापुरात येत आहेत. ते ४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते रेसिडेन्सी क्लब येथील महाराष्ट्राच्या राज्यपालांसोबत बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते सातारा आणि पुण्यातील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.