लिंबूमार आंदोलनातून राज्यपालांचा निषेध, शिवकालीन युद्धनितीचा वापर
By संदीप आडनाईक | Published: December 11, 2022 02:15 PM2022-12-11T14:15:53+5:302022-12-11T14:17:04+5:30
कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी : शिवाजी पेठेतून दांडपट्टा लाठी असोसिसएनने काढला मोर्चा
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपालपदावरुन हकालपट्टी करा, या मागणीसाठी शिवभक्त लोकआंदोलन समिती आणि कोल्हापूर जिल्हा दांड-पट्टा,लाठी असोसिएशनने रविवारी अनोखे लिंबूमार आंदोलन केले. यावेळी शिवाजी पेठेतून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांमध्ये आणि कोश्यारींचा धि:कार करत शिवाजी पेठेतील सरदार तालीम येथून या मोर्चास प्रारंभ झाला. उभा मारुती चौकातून निघालेल्या या मोर्चाची सांगता निवृत्ती चौकात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर पारंपारिक शिवकालीन युध्दनितीने लिंबू मार आंदोलनाने मोर्चाची सांगता झाली.
कोल्हापूर जिल्हा दांड-पट्टा असोसिएशनचे वस्ताद पंडितराव पोवार, मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, शंकर शेळके, श्रीकांत भोसले, नाना सावंत, विनोद साळोखे, सूरज ढोली, अमोल बुचडे, योगेश गुंजेकर उपस्थित होते. निवृत्ती चौकातील लिंबूमार आंदोलनात असोसिएशनच्या रणरागिणी आणि रणमर्द शिलेदारांनी कोश्यारी यांच्या प्रतिमेवर ठेवलेले लिंबू तलवारीने कापून त्यांचा निषेध केला.
यानंतर पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शाहीरांनी शिवरायांचा पोवाडा गाउन या आंदोलनात सहभाग नोंदविला. याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या आंदोलनात कै. आनंदराव पोवार प्राचीन युध्दकला प्रशिक्षण संघटना, शिवगर्जना प्राचीन युध्दकला संस्था, जुना बुधवार पेठ मर्दानी आखाड्याचा तसेच श्रीमंत योगी मर्दानी आखाडा, पाडळी यांचा समावेश होता.
सहा वर्षाचा शिवरत्न, ७२ वर्षांचे शिकलगार सहभागी
सहा वर्षाचा शिवरत्न योगेश गुंजेकर तर ७२ वर्षांचे बाळासाहेब शिकलगार या आंदोलनात सहभागी झाले. गौरव डोंगरे, राजेश पाटील, अभिषेक पाटील, योगेश गुंजेकर यांच्यासह पूर्वा पाटील यांनी लिंबू कापून कोश्यारी यांचा निषेध केला.