गोविंद पानसरे खटल्याची येत्या शुक्रवारी सुनावणी, तावडे, गायकवाड, अंदुरेला दोषमुक्त करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:15 PM2022-02-15T12:15:23+5:302022-02-15T12:15:55+5:30
हा अर्ज संशयितांच्या वतीने ॲड.समीर पटवर्धन यांनी महिन्यापूर्वीच न्यायालयात सादर केला आहे
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेले संशयित डॉ.वीरेंद्र तावडे, समीर गायकवाडसह सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे, अशा केलेल्या अर्जावर शुक्रवारी (दि. १८ फेब्रुवारी) रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी होत आहे.
हा अर्ज संशयितांच्या वतीने ॲड.समीर पटवर्धन यांनी महिन्यापूर्वीच न्यायालयात सादर केला आहे. पानसरे यांच्या हत्येला दि. २० फेब्रुवारीला सात वर्षे पूर्ण होत असल्याने या सुनावणीला महत्त्व आहे.
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने १२ संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे, पण डॉ.वीरेंद्र तावडे, समीर गायकवाड, सचिन अंदुरेविरुद्ध कोणताही सबळ पुरावा उपलब्ध झालेला नाही. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेल्या अग्निशस्त्रांसह काडतुसे, रिकाम्या पुंगळ्या व वाहनांचा अद्याप तपास लागला नाही.
त्यामुळे या तिघांना खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी मागणी संशयितांच्या वतीने ॲड.पटवर्धन यांनी अर्जाद्वारे केली आहे. त्या अर्जावर शुक्रवारी (दि. १८) सुनावणीत युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.