गोविंद पानसरे हत्या सुनावणी : ‘इव्हेंट’पूर्वी सीसीटीव्हीची केली रेकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 08:31 PM2019-01-23T20:31:11+5:302019-01-23T20:33:04+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्यांपैकी संशयित आरोपी अमित देगवेकरची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २८ जानेवारीपर्यंत वाढ केली. यापूर्वी संशयित अमोल काळेकडे सापडलेल्या डायरीमध्ये काही सांकेतिक शब्दांचा अमित देगवेकरकडून उलगडा झाल्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे व तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी न्यायालयात मांडली.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्यांपैकी संशयित आरोपी अमित देगवेकरची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २८ जानेवारीपर्यंत वाढ केली. यापूर्वी संशयित अमोल काळेकडे सापडलेल्या डायरीमध्ये काही सांकेतिक शब्दांचा अमित देगवेकरकडून उलगडा झाल्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे व तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी न्यायालयात मांडली.
ज्येष्ठ नेते पानसरे हत्येप्रकरणी ‘कोल्हापूर एसआयटी’ने संशयित अमित देगवेकर याला दि. १५ जानेवारी रोजी बंगलोर कारागृहातून ताब्यात घेतले. त्याची नऊ दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी त्याला पुन्हा सत्र न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले.
न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद मांडला. अटकेतील संशयित अमोल काळे याच्याकडे मिळालेल्या डायरीत काही सांकेतिक शब्द आढळलेत, त्यांचा तपासात संशयित देगवेकरकडून खुलासा झाल्याचे अॅड. राणे यांनी न्यायालयाला सांगितले. पानसरे यांचा ‘इव्हेंट’ करण्यापूर्वी सीसी टीव्ही रेकीची जबाबदारी आपल्यावर होती, अशी कबुली त्याने दिल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले.
पानसरे हत्येसाठी चोरलेल्या दुचाकीची माहिती देगवेकरला आहे. तो वीरेंद्र तावडे याच्यासोबत चार-पाच वेळा कोल्हापुरात आला होता. त्या कालावधीत तो कोणाला भेटला? कोठे राहिला, याची माहिती आवश्यक आहे. बेळगाव स्टँडवर वीरेंद्र तावडे, अमोल काळे, अमित देगवेकर, भरत कुरणे यांची बैठक झाली. त्यावेळी तावडे याने काहींना एअरगन चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ती शस्त्रे कोठे गेली? त्याचा कशासाठी वापर केला? त्याच्या चौकशीसाठी देगवेकरला आणखी सहा दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी अॅड. राणे यांनी केली.
संशयितांच्या वतीने बाजू मांडताना अॅड. समीर पटवर्धन यांनी, ‘एसआयटी’ने अमोल काळे व वीरेंद्र तावडे याला ताब्यात घेतले होते त्या वेळी या बाबी का समोर आल्या नाहीत? असे प्रश्न उपस्थित करीत पोलीस कोठडीसाठी बालिशपणा केला जात असल्याचा युक्तिवाद केला.
तसेच त्यांनी बंगलोर एसआयटीच्या तपासाची कॉपी कोल्हापूरचे तपास अधिकारी करीत असल्याचा आरोप केला. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश राऊळ यांनी संशयित अमित देगवेकरच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची (दि. २८ जानेवारीपर्यंत) वाढ केली.
सांकेतिक भाषेचा तपासातील उलगडा
- २.५ : धर्माविरुद्ध काम करणाऱ्याला नुकसान पोहचवा.
- ३ : त्याचा सर्वनाश करा
- इव्हेंट : सर्वनाश करून काम फत्ते करा.
देगवेकर आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय
संशयित अमित देगवेकर हा गोव्यातील ‘सनातन’च्या आश्रमामध्ये जात होता. तेथे संशयित सारंग अकोलकर आणि विनय पोवार यांच्या येणाऱ्या नातेवाइकांच्या तो संपर्कात होता. त्यामुळे या दोघा संशयितांची माहिती काढण्यासाठीही पोलीस कोठडीत वाढ मिळावी, अशीही मागणी अॅड. राणे यांनी केली.