पानसरे हत्या खटला: समीरच्या मोबाइल संभाषणाची न्यायालयात पडताळणी
By उद्धव गोडसे | Published: October 10, 2023 12:13 AM2023-10-10T00:13:33+5:302023-10-10T00:14:06+5:30
पंच साक्षीदाराचा सरतपास पूर्ण, मंगळवारी उलट तपासणी
उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्याची सुनावणी सोमवारी (दि. ९) तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर झाली. संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (रा. सांगली) याच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमधील त्याच्या संभाषणाची आणि आवाजाची न्यायालयात पडताळणी झाली. तसेच मोबाइलमधील मेमरी कार्ड आणि संभाषणाच्या लिखित प्रतिच्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली.
विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या घरी पोलिसांना काही मोबाइल मिळाले होते. त्यापैकी एका मोबाइलच्या मेमरी कार्डमधील संभाषण पोलिसांच्या हाती लागले होते. त्यात समीरने त्याच्या मैत्रिणीसह काही सहकाऱ्यांशी साधलेल्या संवादाचे संभाषण होते. संभाषणात गुन्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती असल्याने पोलिसांनी मेमरी कार्ड जप्त करून त्यातील संभाषणाची संहिता (लिखित प्रत) तयार केली होती. तसेच त्याच्या आवाजाचे नमुने घेऊन दुसरे मेमरी कार्ड तयार केले. त्यावेळच्या पंच साक्षीदारांची साक्ष सोमवारी झाली. सरकारी वकिलांनी घेतलेल्या साक्षीत साक्षीदाराने पंचनाम्याचा घटनाक्रम सांगून न्यायालयात मेमरी कार्ड आणि त्यातील संभाषण ओळखले.
उलट तपास मंगळवारी (दि. १०) होणार आहे. यावेळी बचाव पक्षाच्यावतीने ॲड. अनिल रुईकर, वीरेंद्र इचलकरंजीकर, प्रीती पाटील आदी उपस्थित होते. सर्व दहा संशयित आरोपीही सुनावणीसाठी पोलिस बंदोबस्तात उपस्थित होते.
संभाषणाची संहिता ४२ पानांची
संशयित समीरच्या संभाषणाची संहिता ४२ पानांची आहे. त्यात मैत्रिणीसह काही सहकाऱ्यांशी केलेला संवाद आहे. संभाषणात त्याने अनेकदा गोविंद पानसरे याच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसेच काही संशयास्पद संवाद हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मोबाइल वाजला अन् न्यायाधीशांनी आरोपीस सुनावले
सुनावणीसाठी आरोपींच्या कक्षात उपस्थित असलेला संशयित समीर गायकवाड याचा मोबाइल मध्येच वाजला. याची गंभीर दखल घेऊन न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी संशयितास समोर बोलवले. त्याला कडक शब्दात समज देऊन न्यायालयात पुन्हा गैरवर्तन खपवून घेणार नसल्याचे सांगितले. सुनावणीसाठी उशिरा आल्याबद्दलही त्याला खडसावले. पोलिसांनी त्याचा मोबाइल काढून घेतला.