गोविंद पानसरे खून खटला: मेमरी कार्ड अन् संभाषण संहितेत विसंगती, पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 05:31 PM2023-10-11T17:31:02+5:302023-10-11T17:31:18+5:30
काही अडचणीचे प्रश्न विचारून पंच साक्षीदारास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी केला
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्या मोबाइलमधील संभाषण आणि पोलिसांनी त्यावरून तयार केलेल्या संहितेत विसंगती असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी मंगळवारी पंच साक्षीदाराच्या उलट तपासणीत केला. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला होणार आहे.
पानसरे खून प्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना गुन्ह्याशी संबंधित असलेले संभाषण मिळाले होते. त्या संभाषणाचे मेमरी कार्ड जप्त करून पोलिसांनी त्यावरून संभाषणाची संहिता तयार केली. त्यावेळच्या पंच साक्षीदाराचा सरतपास झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांना मंगळवारी उलट तपास घेतला. मेमरी कार्डमधील संभाषण आणि पोलिसांनी तयार केलेल्या संहितेत विसंगती असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न बचाव पक्षाचे वकील अनिल रुईकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि समीर पटवर्धन यांनी केला.
यावेळी काही अडचणीचे प्रश्न विचारून पंच साक्षीदारास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. मात्र, विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी वेळोवेळी त्यावर आक्षेप घेऊन पंच साक्षीदारावर दबाव टाकू नये, अशी विनंती केली. सुनावणीसाठी सर्व संशयित आरोपी पोलिस बंदोबस्तात उपस्थित होते. काही संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला होणार आहे.