गोविंद पानसरे खून खटला सुनावणी: गुन्ह्याचा उद्देश स्पष्ट करणारे पुरावे न्यायालयात सादर
By उद्धव गोडसे | Published: September 7, 2023 06:49 PM2023-09-07T18:49:45+5:302023-09-07T18:51:02+5:30
पंच साक्षीदाराने जप्त पुस्तके, डायरी ओळखून त्यातील काही मजकूरही कोर्टात सांगितला
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात गुरुवारी (दि. ७) तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी पंच साक्षीदाराचा सरतपास घेतला. यावेळी पानसरे यांच्या खुनाचा उद्देश स्पष्ट करणारे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच पंच साक्षीदाराने जप्त पुस्तके, डायरी ओळखून त्यातील काही मजकूरही कोर्टात सांगितला. बचाव पक्षामार्फत शुक्रवारी (दि. ८) पंच साक्षीदाराची उलट तपासणी होणार आहे.
पानसरे यांच्या खुनानंतर पोलिसांनी पहिला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याला सांगलीतून अटक केली होती. त्याच्या घरात जप्त केलेल्या ६८ वस्तूंची तपास अधिका-यांनी पडताळणी केली. त्यावेळच्या पंच साक्षीदाराचा सरतपास न्यायाधीशांसमोर झाला. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी जप्त वस्तू न्यायाधीशांसमोर सादर करून त्याबद्दल साक्षीदारांना प्रश्न विचारले. 'संशयित आरोपी समीर गायकवाड याच्याकडील पुस्तकांमध्ये सनातन संस्था, सनातन धर्म, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याबद्दलची माहिती मिळाली. धर्मविरोधी विचार संपवण्यासाठी कृती करण्याची गरज असल्याचा मजकूर त्यात होता,' अशी साक्ष पंच साक्षीदारांनी दिली.
'संशयिताच्या घरातून जप्त केलेल्या वस्तूंमधून गुन्ह्याचा उद्देश स्पष्ट होत असून, तो न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न केला. बचाव पक्षाच्या वतीने शुक्रवारी साक्षीदाराची उलट तपसाणी होईल,' अशी माहिती विशेष सरकारी वकील निंबाळकर आणि राणे यांनी दिली. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने ॲड. अनिल रुईकर, ॲड. प्रीती पाटील, आदी उपस्थित होते. बेंगळुरू कारागृहातील संशयितांनी व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थिती लावली, तर पुण्यातील येरवडा कारागृहातील संशयित आरोपी न्यायालयात उपस्थित होते.