गोविंद पानसरे खून खटला सुनावणी: जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या, उलट तपासणीत प्रश्नांची सरबत्ती
By सचिन भोसले | Published: September 8, 2023 07:27 PM2023-09-08T19:27:03+5:302023-09-08T19:28:02+5:30
दोन वेळा वकिलांत शाब्दीक वाद
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात शुक्रवारी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्यासमोर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यात पहिला संशयित आरोपी समीर गायकवाडच्या घरी जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या. यासह अन्य प्रश्नांची सरबत्ती करीत संशयित आरोपीच्या वकीलांनी पंच साक्षीदारांचा उलट तपास घेतला. पुढील सुनावणी नऊ ऑक्टोंबरला आहे.
पुणे येथील येरवडा तुरुंगातील व सध्या जामीनावर असलेला समीर गायकवाड गुरुवारी खटल्यात प्रत्यक्ष हजर होता. तर बंगळूरातील संशयित आरोपी व्हीसीद्वारे सहभागी झाले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी गुरुवारी (दि.७) सर तपास घेतला होता. त्याचा पुढील भाग म्हणून उलट तपास संशयित आरोपीच्या वकीलांनी घेतला. सकाळच्या सत्रात झालेल्या सुनावणीत संशयित आरोपीचे वकील अनिल रुईकर यांनी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनातील पहिला संशयित आरोपी समीर गायकवाड च्या घरी जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या? पुस्तकावर छापील किंमती असताना त्याचा पंचनाम्यात उल्लेख का केला नाही. घरात जप्त केलेल्या वस्तू पुन्हा कोल्हापूरातील अपर पोलिस अधीक्षकांच्या येथे दुसऱ्या पाकिटात घालण्यात आल्या.
यावेळी जुनी पाकिटे कोठे आहेत? जप्त केलेल्या ६८ वस्तूंपैकी एक आणि दोन क्रमांकाच्या पाकीटात किती मोबाईल होते असे विचारले असता पंच साक्षीदाराने उत्तर दिले. ॲड. रुईकर यांनी प्रश्न विचारला असताना ॲड. निंबाळकर यांनी हस्तक्षेप नोंदविला. दोन वेळा वकिलांत शाब्दीक वाद झाला. अखेर न्यायालयाने स्वत: पंचनामा वाचून कामकाज सुरु ठेवले. संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी पंच साक्षीदार हे तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांचे मित्र असल्यानेच त्यांनाच पंच साक्षीदार म्हणून बोलाविले असा प्रश्न केला.
तपासात पोलिसांना अनेकांचे फोन, नावे घेतली होती. त्यातील मी एक होताे, मी मित्र नाही असे पंच साक्षीदाराने सांगितले. पोलिस अधीक्षकांकडे सर्व पंचनामा तयार होता यावर पंच साक्षीदारांनी केवळ सह्या केल्या. पोलिसांनी फिर्यादीला मदत करण्यासाठी हे केले आहे असा आक्षेप नोंदवला. यावर पंच साक्षीदाराने हे चुकीचे आहे असे उत्तर दिले.