गोविंद पानसरे खून खटला: पंच साक्षीदाराने गुन्ह्यातील जप्त पुंगळ्या ओळखल्या, आज पुन्हा सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 12:14 PM2023-07-04T12:14:59+5:302023-07-04T12:18:54+5:30

फोटोंच्या ओळखीला संशयितांच्या वकिलांचा आक्षेप

Govind Pansare murder case: Panch witness identifies the recovered cells from the crime, rehearing today | गोविंद पानसरे खून खटला: पंच साक्षीदाराने गुन्ह्यातील जप्त पुंगळ्या ओळखल्या, आज पुन्हा सुनावणी

गोविंद पानसरे खून खटला: पंच साक्षीदाराने गुन्ह्यातील जप्त पुंगळ्या ओळखल्या, आज पुन्हा सुनावणी

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील सुनावणीत सोमवारी (दि. ३) तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर घटनास्थळाचे पंच साक्षीदार सुभाष पोपटराव वाणी (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांनी गुन्ह्यातील पाच गोळ्यांच्या जप्त केलेल्या पुंगळ्या ओळखल्या. जप्त केलेली रक्तमिश्रित माती आणि गोळीच्या पावडरचे नमुने न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आले. दिवसभरात एकाच साक्षीदाराचा सरतपास पूर्ण झाला. पुढील सुनावणी आज, मंगळवारी होणार आहे.

पानसरे खून खटल्यातील सुनावणीदरम्यान सोमवारी सरकार पक्षामार्फत घटनास्थळावरील पंच साक्षीदार सुभाष वाणी यांची साक्ष नोंदवण्यात आली. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम आणि त्यानंतर घटनास्थळाचा पोलिसांनी केलेला पंचनामा याबाबत साक्षीदारास प्रश्न विचारले. यावेळी हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या पाच गोळ्यांच्या जप्त पुंगळ्या न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आल्या. पंच साक्षीदार वाणी यांनी त्या पुंगळ्या ओळखल्या. हल्लेखोरांनी पानसरे दाम्पत्यावर झाडलेल्या गोळ्यांपैकी काही गोळ्या जवळच्या भिंतीवर लागल्या होत्या. त्या गोळ्यांची पावडर आणि पानसरे दाम्पत्याच्या रक्ताने माखलेली माती पोलिसांनी जप्त केली होती. ते पुरावेही पोलिसांनी कोर्टात हजर केले.

विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सकाळी साडेअकराला सुरू केलेला सरतपास जेवणाची सुटी वगळता सायंकाळी साडेचारपर्यंत चालला. त्यानंतर बचाव पक्षाचे वकील अनिल रुईकर यांनी पंच साक्षीदाराच्या उलट तपासणीस सुरुवात केली. पुढील सुनावणी आज, मंगळवारी होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे, बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन आणि त्यांची वकिलांची फौज उपस्थित होती. सर्व संशयित आरोपींनाही पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते.

वकिलांची खडाजंगी

सुनावणीदरम्यान पंच साक्षीदाराकडून घटनास्थळावरील काही फोटोंची ओळख पटवण्याचा प्रयत्न विशेष सरकारी वकिलांकडून सुरू होता. मात्र, फोटो काढणाऱ्यांकडून फोटोंची ओळख पटवली पाहिजे. घटनास्थळाच्या पंचाकडून त्याची ओळख कशी पटवली जाऊ शकते, असा सवाल बचाव पक्षाच्या वकिलांनी उपस्थित केला. त्यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये काही काळ खडाजंगी झाली. याबाबत बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायाधीशांना अर्ज दिला. त्यावर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती ॲड. समीर पटवर्धन यांनी दिली.

Web Title: Govind Pansare murder case: Panch witness identifies the recovered cells from the crime, rehearing today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.