Kolhapur- पानसरे हत्या प्रकरण: सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मागणारा संशयितांच्या वकिलांचा अर्ज फेटाळला
By उद्धव गोडसे | Published: February 7, 2023 04:15 PM2023-02-07T16:15:01+5:302023-02-07T16:46:52+5:30
सुनावणीत नेमकं काय झाले, पुढील सुनावणी कधी जाणून घ्या
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षामार्फत सादर झालेल्या पुराव्यांपैकी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मागणारा संशयितांच्या वकिलांचा अर्ज न्यायाधीश एस. एस. तांबे (३) यांनी फेटाळला.
तसेच संशयित समीर गायकवाड याच्या वैद्यकीय उपचाराच्या अर्जाबद्दल एसआयटीच्या पोलिसांनी प्रत्यक्ष सांगलीत जाऊन पडताळणी करावी, असे निर्देश न्यायाधीश तांबे यांनी मंगळवारी (दि. ७) झालेल्या सुनावणीत दिले. पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीस होणार आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात १० संशयितांवर आरोपपत्र दाखल झाले असून, सरकार पक्षातर्फे ४३ पुरावे आणि पंचनाम्यांची यादी सादर करण्यात आली आहे. त्यापैकी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याची प्रत मिळावी, असा मागणी अर्ज संशयितांच्या वकिलांनी केला होता.
मात्र, संबंधित फुटेज अस्पष्ट असल्याचे गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबने स्पष्ट केले आहे. सरकार पक्षामार्फत हा पुरावा कोर्टात मांडला जाणार नाही. त्यामुळे त्याची प्रत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे न्यायाधीश तांबे यांनी संशयितांच्या वकिलांचा अर्ज फेटाळला.
मंगळवारच्या सुनावणीत संशयितांच्या वकिलांना पुरावे आणि पंचनाम्यांच्या यादीवर म्हणणे सादर करायचे होते. मात्र, घनास्थळावरील फुटेजच्या पुराव्याची प्रत मिळाली नसल्याने त्यांना म्हणणे सादर केले नाही. पुढील सुनावणीत त्यांना यावर म्हणणे सादर करावे लागणार आहे. सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली, तर संशयितांच्या वतीने ॲड. प्रीती पाटील यांनी बाजू मांडली. यावेळी एसआयटीच्या अधिका-यांसह मेघा पानसरे, दिलीप पवार न्यायालयात उपस्थित होते.