गोविंद पानसरे हत्या प्र्रकरण : पोलीस महानिरीक्षक कार्यालयात आढावा बैठक
By admin | Published: March 27, 2015 10:28 PM2015-03-27T22:28:05+5:302015-03-28T00:07:02+5:30
सीमाभागात पोलिसांची पथके : रितेशकुमार
कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांतील सीमाभागात पोलिसांची पथके कार्यरत आहेत. त्यामुळे नक्कीच पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा छडा लावणारच, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी शुक्रवारी दिली.कसबा बावडा येथील पोलीस महानिरीक्षक कार्यालयात परिक्षेत्रासह कर्नाटक पोलिसांसमवेत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर रितेशकुमार पत्रकारांशी बोलत होते. गोविंद पानसरे यांची हत्या होऊन दीड महिना झाला. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.रितेशकुमार म्हणाले, पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा या जिल्ह्यांतील तसेच पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण भागांतील पोलीस अधिकारी तसेच विविध पथके कार्यरत आहेत. सध्या ३५ पोलीस अधिकारी या कामासाठी नेमण्यात आले आहेत. सर्व दृष्टिकोनांतून तपास सुरू आहे. यासाठी पोलीस दिवस-रात्र झटत आहेत. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गुन्हेशोध पथक (डी. बी.) तसेच दहशतवादविरोधी पथक, कोकणातील अधिकाऱ्यांच्या पथकांची नियुक्ती केली. त्यामुळे मारेकऱ्यांचा छडा लावणारच, असे रितेशकुमार म्हणाले. (प्रतिनिधी)