पानसरेंच्या उपचाराची कागदपत्रे कोर्टात सादर, पुढील सुनावणी २० मे रोजी

By उद्धव गोडसे | Published: May 6, 2023 09:29 PM2023-05-06T21:29:05+5:302023-05-06T21:29:58+5:30

पंच साक्षीदार सय्यद पटेल यांची साक्ष आणि उलट तपासणी झाली असून, उलट तपासणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने सात वकिलांनी पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

Govind Pansare's treatment documents submitted to court, next hearing on May 20 | पानसरेंच्या उपचाराची कागदपत्रे कोर्टात सादर, पुढील सुनावणी २० मे रोजी

पानसरेंच्या उपचाराची कागदपत्रे कोर्टात सादर, पुढील सुनावणी २० मे रोजी

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पानसरे दाम्पत्यावरील उपचाराची १२४ पानांची कागदपत्रे आणि आठ एक्सरे न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तिबिले यांच्यासमोर शनिवारी (दि. ६) सुनावणी झाली. पंच साक्षीदार सय्यद पटेल यांची साक्ष आणि उलट तपासणी झाली असून, उलट तपासणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने सात वकिलांनी पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

ज्येष्ठ कामगार नेते पानसरे, त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमधील पानसरे यांचे केसपेपर, सात एक्सरे आणि उपचाराची ८० कागदपत्रे, तसेच उमा पानसरे यांचा केसपेपर, एक एक्सरे आणि उपचाराची ४४ कागदपत्रे अशी एकूण १२४ कागदपत्रे आणि आठ एक्सरे शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने कागदपत्र जप्तीचे पंच साक्षीदार सय्यद पटेल यांची साक्ष नोंदवण्यात आली. पटेल यांनी कागदपत्र जप्तीचा घटनाक्रम सांगून सर्व कागदपत्र पानसरे दाम्पत्याची असल्याची साक्ष दिली.

सुनावणीसाठी सर्व संशयित आरोपींना पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. उद्या त्यांची रवानगी कर्नाटकातील कारागृहात होणार आहे. पुढील सुनावणी २० मे रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील राणे यांनी दिली.

सात वकिलांची फौज
संशयित आरोपींच्या वतीने ॲड. समीर पटवर्धन, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. प्रीती पाटील, ॲड. अमोघवर्ष खेमलापुरे, ॲड. डी. एम. लटके, ॲड. ए. जी. बडवे आणि ॲड. प्रवीण करोशी या सात वकिलांनी पंच साक्षीदार पटेल यांची उलट तपासणी घेतली. उलट तपासणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने पंच साक्षीदार पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. सकाळच्या सत्रात सुरू झालेली सुनावणी दुपारच्या सत्राच्या अखेरपर्यंत सुरू होती.
 

Web Title: Govind Pansare's treatment documents submitted to court, next hearing on May 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.