जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा पुन्हा एल्गार, उद्या सहकुटूंब कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 30, 2023 03:35 PM2023-11-30T15:35:22+5:302023-11-30T15:35:36+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन आठ महिने झाले तरी त्यावर निर्णय न घेतल्याने ...
कोल्हापूर : राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन आठ महिने झाले तरी त्यावर निर्णय न घेतल्याने राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. सरकार विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी उद्या शनिवारी दुपारी १ वाजता सहकुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यर्ती संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने १४ मार्च रोजी बेमुदत संप पुकारला होता, अखेर आठ दिवसांनी मुख्यमंत्रयांनी २० मार्चला राज्य समन्वय समितीच्या सुकाणू समितीबरोबर चर्चा करून जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षमी प्रभावाने लागू करण्याचे दिल्यानंतर २१ मार्च रोजी संप स्थगित करण्यात आला.
या घटनेला आठ महिने झाले तरी शासनाने निर्णय न घेतल्याने कर्मचारी व शिक्षकांमध्ये संताप आहे. त्यामुळेच ३ नोव्हेंबरला दिल्लीत रामलिला मैदानावर लाखोंचा मोर्चा निघाला.त्यानंतर ८ नोव्हेंबरला राज्यात सहकुटूंब मोर्चा काढण्याचा निर्णय झाला मात्र त्यावेळी परिक्षा व निवडणुकीचे कामकाज असल्याने कोल्हापुरात हा मोर्चा २ डिसेंबरला काढण्यात येणार आहे.
यावेळी खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे भरत रसाळे, शैक्षणिक व्यासपीठचे एस. डी. लाड, महसूल संघटनेचे राहुल शिंदे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत डावरे, यांच्यासह सुधाकर, सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, रमेश भोसले, धोंडीराम चव्हाण, नंदकुमार इंगवले यांच्यासह विविध सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चाचा मार्ग
टाऊन हॉल-दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय. तिथे प्रमुख वक्त्यांची भाषणे झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. माझे कुटूंब माझी पेन्शन व शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या हे मोर्चाचे घोषवाक्य असेल.