जुन्या पेन्शनसाठी येत्या मंगळवारपासून सरकारी काम, शाळा बंद; राज्यातील ऐंशी हजार कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:51 PM2023-03-11T12:51:01+5:302023-03-11T12:51:31+5:30
संपात कोल्हापुरातील ८० हजार कर्मचारी व शिक्षक सहभागी
कोल्हापूर : राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून (दि. १४) बेमुदत संपावर जाणार आहेत. संपात कोल्हापुरातील ८० हजार कर्मचारी व शिक्षक सहभागी होत असल्याची माहिती संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, दादा लाड व भरत रसाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. संपामुळे सरकारी कार्यालये आणि शाळांमधील शिक्षण व्यवस्था ठप्प होणार असून, नागरिकांचे मात्र हाल होणार आहेत.
संपाच्या पहिल्यादिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी २ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. टाऊन हॉल, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी रोडमार्गे बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक ते पुन्हा टाऊन हॉल असा रॅलीचा मार्ग असेल. त्यामुळे मंगळवारपासून सरकारी कार्यालये तर उघडतील, पण कर्मचारी नसल्याने कामकाज होणार नाही. शाळेत विद्यार्थी येतील, पण शिक्षक व अन्य कर्मचारी असणार नाहीत, अशी स्थिती होणार आहे.
जुनी पेन्शनसह कंत्राटी, अंशकालीन, राेजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे भरा, अनुकंपावरील नियुक्त्या बिनशर्त करा, चतुर्थश्रेणी व वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, खासगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करा, अशा विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, असा निर्णय राज्य समन्वय समितीच्या बैठकीत झाला आहे.
बेमुदत संपाची नोटीस देऊनही आणि कोल्हापुरात ४ मार्चला निघालेल्या मोर्चानंतरदेखील राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना जुन्या पेन्शनवर भाष्य केले गेले नाही, हे निषेधार्ह असून, आता बेमुदत संप अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. परिषदेला वसंत डावरे, संजय क्षीरसागर, नितीन कांबळे, अंकुश रानमाळे, योगेश यादव, रमेश भोसले यांच्यासह कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.