दिल्लीतील शाहू पुतळा बदलण्याची शासनाची तयारी; लोकमत इम्पॅक्ट, विधानसभेत केली घोषणा
By समीर देशपांडे | Published: July 5, 2024 03:35 PM2024-07-05T15:35:41+5:302024-07-05T15:35:52+5:30
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘लोकमत’ने हा पुतळ्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर २४ तासातच याबाबत निर्णय झाला असून शाहू प्रेमींनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची शासनाची तयारी आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी मुंबईतील अधिवेशनात केली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘लोकमत’ने हा पुतळ्याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर २४ तासातच याबाबत निर्णय झाला असून शाहू प्रेमींनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, दिल्लीतील हा शाहू महाराजांचा पुतळ्यामध्ये शाहू महाराजांच तब्येत कृश दाखवल आहे. डोळे आत गेलेले आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकात जसा शाहू महाराजांचा पुतळा आहे तसाच पुतळा दिल्लीत बसवण्यात यावा. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटनावेळी मी उपस्थित होतो. याला १२/१३ वर्षे झाली आहेत. परंतू आता हा मुद्दा पुढे आला आहे. तर याबाबत जी काही दुरूस्ती करावी लागेल ती करण्यासाठी शासन तयार आहे. कारण हा विषय शाहू महाराजांशी संबंधित आहे. त्यांचे वंशजच आता लोकसभेला निवडून आले आहेत. त्यांचाही याबाबत विचार घेतला जाईल.
महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी अगदीच विसंगत असल्याने ते बदलावेत अशी मागणी ‘लोकमत’ने केली होती. याला शाहूप्रेमी व्यक्ती आणि भाजप, कृती समितीने साथ देत मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या बातमीचा परिणाम २४ तासात दिसून आल्याबद्दल आणि शाहू पुतळा बदलण्याच्या निर्णयाबद्दल शाहू प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.