ग्रा.पं. निवडणुकीच्या तयारीला लागा
By admin | Published: April 13, 2017 12:38 AM2017-04-13T00:38:39+5:302017-04-13T00:38:39+5:30
चंद्रकांतदादा पाटील : तुरंबे येथे राधानगरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा
तुरंबे : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना करून देऊन आपल्या गावामध्ये भाजप मजबूत करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे पंडित दीनदयाळ उपाध्ये जन्मशताब्दी वर्ष समारोह कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या राधानगरी तालुका भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च शून्य करण्यासाठी नवीन योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्जेच काढावी लागणार नाहीत. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सत्ता हे माणूस सुखी करण्याचे माध्यम होण्यासाठी गावागावांतील शेवटचा माणूस सुखी करण्यासाठी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. शेतकऱ्यांना कर्जात जाण्यापासून वाचवून त्याला सक्षम करण्याचा प्रयत्न सरकारचा असून, त्यासाठी चांगली योजना करण्याचे काम सुरू असून, लवकरच योजना कार्यान्वित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येण्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी केले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक आणि भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई म्हणाले, भविष्याचा वेध घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वेळ द्यावा. भविष्यातही भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष असेल. भविष्यातील सर्वच योजना ग्रामपंचायतीमधून देण्याची योजना असल्याने ग्रामपंचायतीमध्ये पक्षाची सत्ता असणे गरजेचे आहे. यावेळी भुदरगड तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य व्ही. टी. जाधव यांची भाषणे झाली. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग, प्रवीण सावंत, संभाजी आरडे, मीनाक्षी नकाते, डॉ. सुभाष जाधव, दिलीप चौगले, सुधाकर गुरव यांच्यासह राधानगरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुरंबे (ता. राधानगरी) येथे पंडित दीनदयाळ उपाध्ये जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राधानगरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा संघटक बाबा देसाई, लहू जरग, प्रवीण सावंत, धनाजी मोरुसकर, आदी उपस्थित होते.