पदवीपासूनच संशोधनाला गती देणार
By Admin | Published: December 30, 2015 09:42 PM2015-12-30T21:42:52+5:302015-12-31T00:34:54+5:30
देवानंद शिंदे : विद्यापीठाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नशील
गुणवत्तापूर्ण, संस्कृती जोपासलेल्या, संशोधनात्मक अशा अनेक बिरुदावल्या जोपासणारे शिवाजी विद्यापीठ हे दक्षिण महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळवून गुणवत्तेचा केंद्रबिंदू मुंबई, पुण्याकडून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे सरकविणाऱ्या विद्यापीठाचा नववर्षातील वाटचालीचा रोड मॅप कसा राहणार, विद्यापीठाच्या घटकांसाठी कोणत्या नव्या योजना राबविल्या जाणार याबाबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
प्रश्न : गेल्या सहा महिन्यांतील कामकाजाचा अनुभव कसा आहे?
उत्तर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी माझी निवड झाल्यानंतर काही जणांनी येथील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना तसेच कोल्हापूरकरांची विद्यापीठाबाबतची भूमिका याबाबत काही घटना सांगितल्या. त्यामुळे सुरुवातीला मला काहीसे दडपण आले होते. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर वास्तव वेगळे असल्याचे जाणविले. गेल्या सहा महिन्यांतील कामकाजाचा अनुभव चांगला आहे. विद्यापीठाशी निगडित असलेला प्रत्येक घटक विद्यापीठाच्या विकासात सहभाग नोंदविण्यासाठी आग्रही आणि सक्रिय आहे. संबंधित घटकांची ही भूमिका विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण करून देण्याला बळ देत आहे.
प्रश्न : नववर्षातील विद्यापीठाची वाटचाल कशी राहणार?
उत्तर : विद्यार्थिभिमुख कामकाज आणि संशोधन या घटकांवर भर देणारा नव्या वर्षातील विद्यापीठाच्या वाटचालीचा ‘रोड मॅप’ असणार आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांसह पदवी मिळते, पण नोकरीसाठी त्यांना झटावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी ‘जॉब रेडी’ (नोकरीक्षम) बनविण्याच्या योजना राबविण्यात येतील. कौशल्यपूर्ण, व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू केले जातील. दहावी-बारावी, पदवी अशा टप्प्यानिहाय हे अभ्यासक्रम असतील. त्यासाठी नॅसकॉम, सीडेक, इंडो-जर्मन टूरसह काही मोठे उद्योजक, कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. ‘चॉईस अॅण्ड क्रेडिट बेस सिस्टीम’वरील अभ्यासक्रम वाढविण्यात येणार आहेत. प्रशासनाचे कामकाज पेपरलेस करून पर्यावरण संवर्धनाला बळ दिले जाईल. त्याची सुरुवात म्हणजे महाविद्यालयांशी सर्व पत्रव्यवहार ई-मेलद्वारे करण्यात येईल. विद्यापीठात सध्या असलेल्या योजना, उपक्रमांची व्याप्ती वाढविली जाईल.
प्रश्न : संशोधनाला बळ देण्याबाबत काय केले जाणार आहे?
उत्तर : संशोधन, कौशल्य आणि तंत्रज्ञान यावरच अधिकत्तर भविष्यातील शिक्षण आधारित असणार आहे. हे तीन घटक विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठीचा मार्ग राहणार आहे. त्यामुळे संशोधनाला बळ देण्याच्या विविध योजनांची सुरुवात नव्या वर्षात केली जाईल. पदवीच्या शिक्षणाचा कालावधी हा संशोधनासाठी अधिक चांगला ठरणारा असतो. कारण, या वयात अनेक नवकल्पना सुचत असतात. ते लक्षात घेऊन पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनाला प्रवृत्त करण्यासाठी ‘संशोधन जागृती कार्यक्रम’ राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनाबाबतच्या नवकल्पना महाविद्यालयाने सादर केल्यास त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी विद्यापीठाकडून निधी दिला जाईल. अशा स्वरूपातील राज्यातील ही पहिलीच अभिनव योजना आहे. महाविद्यालयीन शिक्षकांना संशोधनासाठी निधी दिला जाणार आहे. बौद्धिक क्षमता आहे, पण आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना ‘रिसर्च फेलोशिप’ सुरू केली जाईल. त्यासह संशोधक विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू केले जाईल. तसेच उत्तम संशोधक विद्यार्थी, शिक्षक पुरस्कार देणार आहे.
प्रश्न : प्रशासकीय व्यवस्थेला गती देण्यासाठी काय करणार?
उत्तर : विद्यापीठाच्या कामकाजात प्रशासकीय व्यवस्था ही एक महत्त्वाचे अंग आहे. त्यातील अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी हे घटक महत्त्वपूर्ण आहेत. बदलत्या तंत्रज्ञानासह त्यांना विविध स्वरूपातील प्रशिक्षण देऊन ‘अपडेट’ केले जाईल. त्यासह पेमेंट गेट-वे, एम्प्लॉईज कॉर्नर अशा तंत्रज्ञानावर आधारित सुविधा सुरू करून प्रशासकीय व्यवस्थेला गती देण्यात येईल. कर्मचाऱ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना बळ दिले जाणार आहे.
प्रश्न : विद्यापीठाच्या घटकांकडून कोणती अपेक्षा आहे?
उत्तर : विद्यापीठाचे कामकाज हे जगन्नाथाच्या रथासारखे आहे. त्यात प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येकाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या कोल्हापूरचा शैक्षणिक वारसा विद्यापीठाच्या माध्यमातून अधिक समृद्ध करण्याच्या जबाबदारीने मी कार्यरत राहीन. विद्यापीठाचा सर्वसमावेशक विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याला विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे. नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी बळ द्यावे इतकीच अपेक्षा आहे.
- संतोष मिठारी