पदवीचे वर्ग आजपासून भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:09+5:302021-02-15T04:22:09+5:30
पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गांनंतर आता पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरविण्यास ...
पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गांनंतर आता पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरविण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित २९३ महाविद्यालयांना आणि विद्यापीठातील ३९ अधिविभागांना कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार महाविद्यालयांनी शुक्रवारी आणि शनिवारी वर्ग आणि महाविद्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता केली. सॅनिटायझर स्टँड, हात धुण्याची व्यवस्था आदी सुविधा महाविद्यालयांमध्ये करण्यात आल्या आहेत. प्रत्येक दिवशी वर्गात ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था असणार आहे. प्रवेशद्वारावर थर्मल गनने तपासणी करून विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालयांमधील वर्ग भरणार असल्याने कॉलेज कॅम्पस पुन्हा गजबजणार आहे.
चौकट
दुसऱ्या टप्प्यात वसतिगृह
कोरोनाच्या संस्थात्मक अलगीकरण, केअर सेंटरसाठी विद्यापीठासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे तेथील जिल्हा प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतली होती. या प्रशासनाने त्यातील बहुतांश संस्थांच्या ताब्यात पुन्हा वसतिगृहे दिली आहेत. मात्र, त्यांची डागडुजी, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करावी लागणार आहे. त्यानंतर ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे सध्या पहिल्या टप्प्यात वर्ग भरविण्याचे आणि महिनाअखेरपर्यंत दुसऱ्या टप्प्यात वसतिगृहे सुरू करण्याचे नियोजन महाविद्यालय प्रशासन, शैक्षणिक संस्थांनी केले आहे.