पदवीसाठी प्रवेशाचे त्रांगडे
By admin | Published: August 1, 2016 12:33 AM2016-08-01T00:33:41+5:302016-08-01T00:33:41+5:30
अनेक विद्यार्थी प्रवेशाविना : विद्यापीठ, महाविद्यालयांना आदेशाची प्रतीक्षा
कोल्हापूर : अतिरिक्त तुकड्या आणि ४० टक्के वाढीव प्रवेश देऊन देखील पदवीच्या प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न कायम आहे. अद्यापही बहुतांश विद्यार्थी प्रवेशाविना असून बारावीच्या पुनर्परीक्षेच्या निकालानंतर पुन्हा प्रवेशासाठीचे विद्यार्थी वाढणार आहेत. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, अशा स्वरूपातील शासनाच्या आदेशाची शिवाजी विद्यापीठासह महाविद्यालयांना प्रतीक्षा आहे.
कोल्हापूर विभागातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का यंदा वाढल्याने ‘पदवी’च्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवेशाअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विविध महाविद्यालयांनी यावर्षी कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांसाठी अतिरिक्त तुकडी देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली. महाविद्यालयांचे अतिरिक्त तुकडी मागणीचे १२५ प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर केले. त्यातील १२३ प्रस्तावांना शासनाने मान्यता दिली. त्यानंतर विद्यापीठाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तुकडी मागणी केलेल्या महाविद्यालयांतील सुविधांची पाहणी केली. त्यातून काही महाविद्यालयांना अतिरिक्त तुकडी, तर काहींना तुकडीच्या ४० टक्के प्रवेश क्षमता वाढवून दिली. त्यानुसार महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबविली. या वाढीव क्षमतेतून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, अजूनही बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत शिवाय काही विद्यार्थ्यांना ठरावीक महाविद्यालयांत प्रवेश हवा आहे; पण, क्षमता संपल्याने या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. बारावीच्या पुनर्परीक्षेच्या निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, असा आदेश शासनाकडून देण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालयांकडून होत आहे.