१ मेपासून धान्य वितरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:21+5:302021-04-16T04:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानदारांना विमा कवच अथवा मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानदारांना विमा कवच अथवा मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत शासनाकडून मिळालेली नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने १ मे २०२१ पासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरण व धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, याबाबतचे निवेदन इचलकरंजी शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना देण्यात आले.
कोरोनामुळे एखाद्या दुकानदाराचा मृत्यू झाल्यास त्याला तत्काळ आर्थिक मदत व ५० लाख रुपये विमा कवच मिळावे, राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करताना प्रति क्विंटल १ ते १.५ किलो घट येते, ती घट ग्राह्य धरण्यात यावी व शासकीय धान्य गोदामामधून धान्य दुकानदारांना ५० किलो ८०० ग्रॅम वजनाची पोती देण्यात यावीत, असे निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात बाबासाहेब मुजावर, दिनकर पाटील, पांडुरंग सुभेदार, आनंदा पोवार, नामदेव पाटील, दीपक ढेरे, उत्तम पाटील आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
१५०४२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजी शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.