रेशन कार्डास आधार लिंक न झाल्यास धान्य बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:20 PM2021-01-15T12:20:28+5:302021-01-15T12:22:29+5:30
Collcatior Kolhapur- लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपूर्वी फिड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोल्हापूर : लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार कार्ड लिंक करणे आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक ३१ जानेवारीपूर्वी फिड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ज्या व्यक्तीचे आधार कार्ड लिंक होणार नाही, त्यांचेच फक्त धान्य फेब्रुवारीपासून कार्ड लिंक होईपर्यंत थांबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. एका कार्डावर पाच व्यक्ती असतील व त्यातील चौघांचे आधार नंबर लिंक असतील तर त्यांना धान्य मिळेल. ज्यांचे लिंक नसेल तेवढ्याच व्यक्तीला ते दिले जाणार नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात ५ लाख ६० हजार रेशन कार्ड आहेत. त्यावरून सुमारे २५ लाखांवर लोकांना रेशन धान्याचे वाटप केले जाते. त्यातील ८४ टक्के नागरिकांचे आधार कार्ड यापूर्वीच लिंक करण्यात आले आहेत. उर्वरित १६ टक्के नागरिकांचे राहिले आहेत, त्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. रेशन धान्य संबंधित व्यक्तीलाच मिळावे, त्यातून गैरप्रकार होऊ नयेत, यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक देण्यात आलेले नाहीत त्यांनी रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड घेऊन जावे. तिथे जावून बोटाचे ठसे देऊन फिडींग पूर्ण करावे.
हे काम रेशन दुकानातच केले जाणार आहे. त्यासाठी अन्यत्र कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.