शिरोळमध्ये २० हजार पूरग्रस्त कुटुंबांना धान्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:31+5:302021-08-12T04:28:31+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शासनाने पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण करण्याचे ...
संदीप बावचे
जयसिंगपूर :
अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शासनाने पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील २० हजारांहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना शासनाकडून धान्य वितरण केले जात आहे. गहू, तांदूळ, डाळ यांचे वितरण केले जात असले तरी तालुका केरोसीनमुक्त असल्यामुळे त्याच्या वाटपाबाबत सध्यातरी प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिरोळ तालुक्यातील ४२ गावांना महापुराचा फटका बसला आहे. कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांच्या महापुरामुळे ८० हजार नागरिकांनी स्थलांतर केले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारने अनेक मदतीच्या घोषणा केल्या. जवळपास ४४ निवारा केंद्रांमध्ये पंधरा हजारांहून अधिक पूरग्रस्त आश्रयाला होते. अन्य पूरग्रस्त पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे गेले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह वेगवेगळ्या विभागांचे मंत्री व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी केली.
पूर ओसरल्यानंतर गावाकडे गेलेल्या पूरग्रस्तांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ व पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार सध्या तालुक्यातील २० हजारांहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात पंचनामे सुरू असून आणखी पूरग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनाही मोफत अन्नधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केरोसीन वाटपाबाबत अडचणी
शिरोळ तालुका केरोसीनमुक्त तालुका म्हणून नोंद आहे. त्यामुळे रास्त भाव धान्य दुकानदारांनी रॉकेल पुरवठा करणारे बहुतांशी टँक हटविले आहेत. राज्य शासनाने पूरग्रस्तांना मोफत केरोसीन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, केरोसीनमुक्त तालुका आणि साठविण्यासाठी टँकची सोय नसल्याने सध्यातरी वाटपाबाबत अडचणी आहेत.
पूरग्रस्त धान्यापासून वंचित
ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले आहे, अशा पूरग्रस्त कुटुंबांना धान्याचे वितरण सुरू आहे. २०१९ ची पूररेषा लक्षात घेऊन ज्यांनी घर सोडले मात्र त्यांच्या घरात पुराचे पाणी आलेले नाही, असे नागरिक मात्र धान्यापासून वंचित राहिले आहेत.