gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:34 PM2022-12-05T17:34:38+5:302022-12-05T17:35:01+5:30
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे ग्रामीण वातावरण ऐन थंडीत गरम होऊ लागले
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज (सोमवारी) छाननी होत आहे. विरोधकांना रोखण्याची पहिली संधी छाननी असते, त्यासाठीची व्यूहरचना गावपातळीवर वेग घेत आहे. अतिक्रमण, दोनपेक्षा अधिक अपत्य, ग्रामपंचायतीची कर थकबाकी आदींचे दाखले तयार ठेवले आहेत.
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे ग्रामीण वातावरण ऐन थंडीत गरम होऊ लागले आहे. निवडणुकीत कमालीची इर्षा निर्माण झाल्याने सरपंच पदासाठी तब्बल २,७०२ तर सदस्य पदांसाठी १६ हजार ६९१ अर्ज दाखल झाले आहेत. गावागावात इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारी देताना स्थानिक नेत्यांची पुरती दमछाक होत आहे. त्यातही छाननीमुळे इच्छुकांसह नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. एकमेकांना रोखण्यासाठी छाननीदरम्यान हरकती घेण्याची तयारी अनेक गावांत सुरू आहे. छाननीमध्येच विरोधकांची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असणारे दाखले तयार आहेत. त्यामुळे छाननीच्या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिनविरोधसाठीही चर्चेच्या फेऱ्या सुरू
सोमवारी छाननी झाल्यानंतर माघारीसाठी केवळ दोनच दिवस मिळणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच बिनविरोधसाठी काही गावांत हालचाली सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या असून, निवडणूक बिनविरोध करून गावातील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांचा आहे.
यंत्रणा स्वत:हून हरकत घेणार नाही
निवडणूक यंत्रणा स्वत:हून कोणत्याही उमेदवारी अर्जावर हरकत घेणार नाही. त्या अर्जाबाबत कोणाची तक्रार आली तर त्याची शहानिशा करून अर्ज वैध, अवैध ठरविण्यात येणार आहे.
काही गावांत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’
काही गावांत दोन्ही गटांकडे अतिक्रमणधारक, दोनपेक्षा जास्त अपत्य असलेले उमेदवार आहेत. एकमेकांनी हरकत घेतली तर दोघांनाही उमेदवार मिळणार नाहीत, अशी परिस्थिती अनेक गावांत आहेत. त्यामुळे ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असेच सुरू आहे.
अशी राहणार पुढील प्रक्रिया
छाननी - ५ डिसेंबर
माघारीची मुदत - ७ डिसेंबरपर्यंत
चिन्ह वाटप - ७ डिसेंबर दुपारी तीननंतर
मतदान - १८ डिसेंबर
मोजणी - २० डिसेंबर