ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पदफेऱ्यांनी झाली सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 07:05 PM2021-01-13T19:05:55+5:302021-01-13T19:07:52+5:30
Grampanchyat Election Kolhapur-ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून उडालेला जाहीर प्रचाराचा धुरळा बुधवारी सायंकाळी खाली बसला. उमेदवारांनी मोठ्या पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केल्याने गावे निवडणूकमय झाली. आता जाहीर प्रचार संपला तरी एकेक मत निर्णायक असल्याने मतांच्या जोडणीसाठी, फोडाफाडीसाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून उडालेला जाहीर प्रचाराचा धुरळा बुधवारी सायंकाळी खाली बसला. उमेदवारांनी मोठ्या पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केल्याने गावे निवडणूकमय झाली. आता जाहीर प्रचार संपला तरी एकेक मत निर्णायक असल्याने मतांच्या जोडणीसाठी, फोडाफाडीसाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ७२० सदस्य बिनविरोध निवडून आले असून, ७ हजार ६५७ जण रिंगणात आहेत.
सरपंचपदाच्या आरक्षणाशिवाय लढविल्या गेलेल्या या निवडणुकीत सर्वच प्रभाग सरपंचपदाचे गृहीत धरूनच टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच प्रचाराने वेग घेतला; पण ४ जानेवारीला माघारीनंतर खऱ्या अर्थाने धुरळा उडाला होता.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी पॅटर्नसह स्वत:चाही सोईच्या आघाडीचा पॅटर्न राबवत निवडणूक प्रचंड ईर्षेने लढविली जात आहे. स्थानिक पातळीवरील गट-तट आणि त्याला कौटुंबिक संघर्ष व भाऊबंदकी यांचीही फोडणी मिळाल्याने खऱ्या अर्थाने गावच्या राजकारणाने टोक गाठले आहे. कोणत्याही बड्या नेत्यांच्या प्रचारसभांशिवाय केवळ वैयक्तिक भेटीगाठी, कोपरा सभा, एवढ्यावरच प्रचार सिमित राहिला. बड्या नेत्यांची भूमिका पॅनेल निवड आणि आर्थिक रसदीपुरती सिमित राहिली.