Gram Panchayat Election: भाषा झकास, गावे मात्र भकास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:10 PM2022-12-13T19:10:15+5:302022-12-13T19:10:40+5:30

प्रत्येकजण विकासाची भाषा करत मतदारांना करतायत विनवण्या

Gram panchayat election promise remains on paper after the election | Gram Panchayat Election: भाषा झकास, गावे मात्र भकास

Gram Panchayat Election: भाषा झकास, गावे मात्र भकास

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : प्रत्येकजण विकासाची भाषा करत मतदारांना विनवण्या करताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांच्या अजेंड्यावर विकासाचा वचननामा आहे, सर्वजण विकासाची हमी देतात, मग इतकी वर्षे गाव भकास कसे राहिले? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८) मतदान होत आहे. त्यामुळे हळूहळू गावगाड्यातील राजकारण तापू लागले आहे. व्यक्तिगत उमेदवारांसह पॅनल प्रमुखांकडून गावाच्या विकासाचे राेल मॉडेल मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. रस्ते, गटर्ससह व्यक्तिगत लाभाच्या योजना आपणच कसे तुमच्यापर्यंत पोहचवू शकतो, हे ठासून सांगितले जात आहे. सत्ताधारी मंडळी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती पुस्तिका मतदारांसमोर ठेवत आहेत. त्याचबरोबर पुन्हा संधी द्या, उर्वरित कामे पूर्ण करण्याचे अभिवचन दिले जात आहे. 

तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर बोट ठेवत आम्हाला सत्तेची संधी द्या, गाव विकासाचे मॉडेल बनवू, असा विश्वास देत आहेत. गावाच्या विकासाची आश्वासने दोन्ही बाजूने दिली जात असतानाच मतदार मात्र द्विधा मनस्थितीत दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात किती विकास केला हे मतदार जाणून आहेत, हीच मंडळी पुन्हा संधी देण्याचे आवाहन करत आहेत. जे आता विराेधक आहेत, तेही कधीतरी सत्तेत होते. दोन्ही पॅनलकडे विकासाची इतकी दृष्टी आहे तर मग गाव भकास कसे झाले?, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

निवडणुकीतील प्रचारापुरता वचननामा राहतो, सत्ता मिळाली की वचननामा कागदावरच राहतो, हा अनुभव बहुतांशी गावातील मतदारांचा आहे.

आणाभाका, जेवणावळी सुरू

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसे वातावरण तापू लागले आहे. गल्लीतील उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी सर्रास आणाभाका सुरु आहेत. जेवणावळींनी ढाबे फुलू लागले आहेत. एकत्र जेवणावळ करण्यापेक्षा प्रत्येकाला हॉटेलची कूपन दिली जात आहेत.

परगावच्या मतदारांना वाहतुकीची सोय

परगावच्या मतदारांची प्रत्येक उमेदवाराची यादी तयार आहे. त्यांच्याशी संपर्क साधला जात असून मतदान दिवशी त्यांना येण्यासाठी वाहतुकीची सोयही करुन दिली जात आहे.

कटआऊट झळकले....

उमेदवारांचे नाव, चिन्हासह विकासाच्या अभिवचनाचे कटआऊट गावोगावी झळकले आहेत. त्याचबरोबर घरोघरी प्रचार पत्रिका पोहच झाल्या आहेत. मतदारराजा अगदी शांतपणे त्याचे निरीक्षण करुन आपलं मत निश्चित करताना दिसत आहे.

Web Title: Gram panchayat election promise remains on paper after the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.