Gram Panchayat Election: करणीच्या संशयातून परप्रांतीय साधूंना पिटाळले, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 02:20 PM2022-12-16T14:20:10+5:302022-12-16T14:20:37+5:30
साधूंच्या वेशातील चार व्यक्ती गावातील एका उमेदवाराचा पत्ता विचारत त्या घराच्या दिशेने गेले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ही गाडी गावाच्या बाहेर गेली.
सिध्दनेर्ली : कागल तालुक्यातील बामणी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर येथील तरुणांनी काही परप्रांतीय साधूना पिटाळून लावले. करणी व भानामतीच्या उद्देशाने हे साधू आल्याच्या संशयामुळे बामणी गावांमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
याबाबत माहिती अशी, येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (ता.१८) मतदान होत आहे. काल, गुरुवारी सकाळच्या सुमारास चार चाकी गाडीतून साधूंच्या वेशातील चार व्यक्ती गावातील एका उमेदवाराचा पत्ता विचारत त्या घराच्या दिशेने गेले. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ही गाडी गावाच्या बाहेर गेली.
मात्र व्हनाळीजवळ पोलिसांची गाडी बघून ही गाडी परत बामणीकडे आली. त्यावेळी मुख्य रस्त्यावर थांबलेल्या काही तरुणांनी ही गाडी अडवली व त्यांची आक्रमकपणे चौकशी करून चांगलेच फैलावर घेतले. हे हिंदीमध्ये बोलत होते. आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यादरम्यान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही जणांनी पोलिसांना बोलावून घेतले व त्यांना ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना सोडून दिले.