ग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत दादांची पाटीलकी गेली; जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 05:35 AM2021-01-19T05:35:42+5:302021-01-19T07:01:34+5:30
आ. पाटील यांचे गावात कमी वास्तव्य असले तरी चांगला संपर्क आहे. मागील वेळी नऊपैकी आठ जागा बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले होते.
कोल्हापूर/सांगली/सातारा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या खानापूर (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, तिथे शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गटाला नऊपैकी दोन जागांवर समाधान मानावे लागले.
कोल्हापूर- गारगोटी रस्त्यावर गारगोटीच्या अलीकडे एक किलोमीटरवर हे सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव आहे. याठिकाणी एकूण तीन हजार मतदार आहेत. येथील नऊ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचा स्थानिक गट एकत्र आला होता. अखेर निवडणूक निकालानंतर शिवसेनेला सहा, भाजप दोन, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. आ. पाटील यांचे गावात कमी वास्तव्य असले तरी चांगला संपर्क आहे. मागील वेळी नऊपैकी आठ जागा बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले होते.
जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले...
सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची सत्ता उलथवून लावत, चुलत मेहुणे तथा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी बाजी मारली.
म्हैसाळमध्ये १७ पैकी भाजपला तब्बल १५, तर राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर विजय मिळाला. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. भाजपने येथे सत्ता खेचून आणली असून, सासुरवाडीतील राष्ट्रवादीचा पराभव हा जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. येथे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीत जयंत पाटील यांचा लहान मेहुणा, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी पराभूत झाली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढविल्या जात असल्या, तरी जयंत पाटील यांच्या नातेवाइकांचा हा पराभव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का
सातारा - कऱ्हाड दक्षिण मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. मोठ्या ग्रामपंचायती भाजपने अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकल्या आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कऱ्हाड उत्तर मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मंत्री शंभुराजे देसाई यांनी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे.