नाव नसल्याने ग्रामपंचायत सदस्याने फोडला फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:12+5:302021-02-27T04:32:12+5:30
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीमध्ये शौचालयाचे काम पूर्ण झाल्याबाबत लावलेल्या फलकावर सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याव्यतिरिक्त ...
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीमध्ये शौचालयाचे काम पूर्ण झाल्याबाबत लावलेल्या फलकावर सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही सदस्याचे नाव नसल्याने मासिक सभेत वाद निर्माण झाला. यावेळी संतप्त झालेल्या एका ग्रामपंचायत सदस्याने हा फलकच फोडून टाकल्याने सभेमध्ये चांगलेच वातावरण तापले.
एका महिला सदस्याच्या मागणीवरून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून महिला व पुरुष शौचालये बांधण्यात आली आहेत.
पट्टणकोडोली ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांची संख्या जादा असून, सदस्यांकरिता शौचालय नसल्याने अडचणी निर्माण होतात. यामुळे शौचालय बांधण्यात यावे, यासाठी महिला सदस्यांनी मागणी केली होती. या मागणीवरून ग्रामपंचायतीमध्ये पाच लाख रुपये खर्च करून महिला व पुरुष शौचालये बांधण्यात आली आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा फलक लावण्यात आला. यामध्ये सरपंच विजया जाधव, उपसरपंच कृष्णात मसूरकर व ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे यांच्याच नावाचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्या फलकावर इतर सदस्यांची नावे लिहिण्यात आली नव्हती, ही बाब गुरुवारी झालेल्या मासिक सभेत सदस्यांच्या निदर्शनास आल्याने सभेमध्ये या फलकावरून वातावरण चांगलेच तापले. यावेळी संतप्त झालेल्या एका सदस्याने हा फलक खोऱ्याने फोडून काढला. त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्यांत एकमत नसल्याचे उघड झाले आहे.
याबाबत उपसरपंच कृष्णात मसूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, असा कोणताही प्रकार झालेला नाही. ठेकेदाराला सर्वांची नावे असलेला फलक लावण्यास सांगितले होते. मात्र, त्याने हा फलक लावला आहे. तो फलक काढून सर्वांची नावे असलेला फलक लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत, असे मसूरकर यांनी सांगितले.