ग्रामपंचायत सदस्यांनी बंद पाडले काम
By admin | Published: February 5, 2015 12:01 AM2015-02-05T00:01:19+5:302015-02-05T00:13:06+5:30
पट्टणकोडोली पाणी योजना : सरपंच, सदस्य यांच्यात वादावादी
पट्टणकोडोली : पाणी पंचगंगा नदीतून आणायचे की दूधगंगा नदीतून या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली पट्टणकोडोलीतील पाणी योजनेचे काम बुधवारी सुरू होताच ग्रामपंचायत सदस्यांनी बंद पाडले. यावेळी सरपंच व सदस्य यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यामुळे कोट्यवधीची ही योजना रखडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीतील अंतर्गत राजकीय वादामुळेच योजनेचे काम बंद पाडले असल्याची नागरिकांची भावना असून त्याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पट्टणकोडोलीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजनेतून सहा कोटींची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेला प्रारंभापासूनच काही सदस्यांनी विरोध केला होता. पंचगंगा की दूधगंगा नदीवरून पाणी आणायचे यावरून मोठे वादळ निर्माण झाले होते. यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही झाले. या सर्व घडामोडींमुळे सुरू झालेले काम थांबले. दरम्यान, या योजनेसाठी विशेष ग्रामसभा घेतली. या सभेमध्ये राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत योजनेचे काम करा, असे सर्व पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी ठणकावले. त्यानुसार बुधवारी या योजनेचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये मुल्ला गल्ली येथे खुदाई सुरू असताना बुधवारी त्याच प्रभागातील सदस्य मदन चौगुले व पोपट बाणदार यांनी काम बंद पाडले. ( वार्ताहर )
आज कामाबाबत बैठक
या पाईपलाईनसाठी खुदाई करताना नवीनच करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था होणार आहे. त्यामुळे खुदाई रस्त्याच्या मध्येच करायची, की रस्त्याच्या बाजूने करावयाची याबाबत वाद उपस्थित झाल्याने गुरुवारी याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.
मुल्ला गल्ली येथे अगदी गटारीला लागून खुदाई सुरू आहे. त्यामुळे भविष्यात गटारीचे पाणी यामध्ये मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूऐवजी रस्त्यामध्येच खुदाई केल्यास नागरिकांना याचा फायदा होईल, त्यासाठी काम थांबवले आहे.
- मदन चौगुले,
ग्रामपंचायत सदस्य
प्र्रभाग क्र. तीनमध्ये पाण्याची अडचण असल्याने मुल्ला गल्ली येथे प्रथम पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने बुधवारी खुदाईचे काम सुरू करण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था होऊ नये म्हणून रस्त्याच्या बाजूने खुदाई सुरू असताना बुधवारी काही संस्थांनी जाणीवपूर्वक काम थांबविले आहे. वादविवाद न करता पाण्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे.
- सुलभा रजपूत, ग्रामपंचायत सदस्या.