ग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:40 PM2021-01-15T13:40:59+5:302021-01-15T13:47:04+5:30
Grampanchyat Election Voting- राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरु झाले. सर्वत्र मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे जाणवत होते. दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही मोठी खबरदारी घेतली आहे. शारिरिक अंतर ठेवून मतदार मतदान करत होते. बहुतांश केंद्रांवर थर्मल स्कॅनरने मतदारांची तपासणी केली जात होती. याशिवाय सॅनिटायझरचा वापर केला जात होता. अनेक कर्मचाऱ्यांनी फेसशिल्ड, मास्कचा वापर केला.
जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींमध्ये १५५३ केंद्रावर मतदान सुरु झाले. ४७ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी गेल्या महिनाभरापासून गावागावांत राजकीय धुळवड उडाली. ८ लाख ५६ हजार मतदार असून नवे ३ हजार ३०७ सदस्यांची निवडणुकीतून कारभारी निवडले जातील.
आज सकाळी सकाळी ७.३० वाजताच मतदार प्रचंड संख्येने रांगा लाउन मतदान करताना दिसले. निवडून येण्यासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी खास यंत्रणा लावण्यात आली आहे. मतदानादिवशीच किंक्रांत आल्यामुळे राजकीय धुळवड उडाली आहे.
कागल तालुक्यातील बिद्री येथील मतदान केंद्रांवर महिलांनीही मोठ्या हिरीरीने सकाळीच रांगा लाउन मतदान केले. हीच स्थिती मळगे, शिंदेवाडी येथील मतदान केंद्रावर होती. हातकणंगले तालुक्यातील मिणचे, वाठार, पन्हाळा तालुक्यातील पोंबरे, पोर्ले, कोडोली येथील यशवंत हायस्कूल, शिये ता.करवीर येथील केंद्रावर, भुदरगड तालुक्यातील आदमापूर, लक्षवेधी खानापूर आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे रांगा लागल्या होत्या. करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथील युवतींनी मतदानाचा प्रथमच हक्क बजावला. या केंद्रावर डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली.
संवेदनशील केंद्रांवर शांततेत मतदान
संवेदनशील असलेल्या हातकणंगले तालुक्यातील दरवेश पाडळी येथील केंद्रावर शांततेत मतदान झाले.
ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही ठिकाणी गोंधळ
आमदार पी. एन. पाटील यांचे गाव असलेल्या करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्याच्या वेळेतच ईव्हीएम मशीन बंद पडले होते. सकाळी या मशीनची चाचणीच घेण्यात न आल्याने हा प्रकार घडला. ९ वाजेपर्र्यत मशीन सुरु झाले नव्हते. यामुळे अनेक मतदारांनी घरी परतणे पसंत केले. बाचणी, ता. करवीर येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडल्याने गोंधळ उडाला.
या केंद्रावर गोंधळ
यमगे येथे मतदान केंद्रावरचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने अपंग आणि आजारी मतदारांनी परत जाणे पसंत केले.यावेळी पोलिसांशी वादावादी झाली तर कोपार्डे येथेही बोगस मतदानावरुन वादावादी झाली.
यांनी केले मतदान
पन्हाळा तालुक्यातील निवडे येथे सुंदाबाई नाना चव्हाण या १0९ वर्षांच्या वृध्देने मतदान केले तर यड्राव येथील ताराबाई बाबू निर्मळ या ९५ वर्षांच्या वृध्देने आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांना महेश निर्मळ व धीरज ठाणेकर यांनी सहकार्य केले.
मतदानासाठी जनजागृती
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष दिनकर चौगुले यांनी मोटारसायकलवरुन निवडणुकीसाठी अंधश्रध्दा बाळगू नयेत यासाठी जनजागृती सुरु केली होती. आदमापूर येथे मतदान केंद्राबाहेर जनजागृतीसाठी रांगोळी काढण्यात आली होती.