ग्रामपंचायत कर्मचारीप्रश्नी आठ दिवसात कार्यवाहीचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:35+5:302021-09-04T04:28:35+5:30
कोल्हापूर: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आठ दिवसात कार्यवाही पत्र देऊ, अशी ग्वाही जिल्हा परिषद सीईओ संजयसिंह चव्हाण ...
कोल्हापूर: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आठ दिवसात कार्यवाही पत्र देऊ, अशी ग्वाही जिल्हा परिषद सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.
वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनदेखील मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. दुपारी एक वाजता महावीर उद्यान येथून निघालेला मोर्चाने घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेवर धडक दिली. येथे आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यालयाचे दोन गेट बंद करून आत जाण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. आंदोलकांनी गेटजवळच घोषणा दिल्यानंतर आप्पा पाटील, जयश्री पाटील, औदुंबर साठे, सुकुमार कांबळे यांचे शिष्टमंडळ सीईओ चव्हाण यांना जाऊन भेटले. त्यांनी आंदोलकांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारुन प्रलंबित प्रश्नाबाबत आठ दिवसात कार्यवाही करू असे आश्वासित केले. तत्पूर्वी शिष्टमंडळाने कामगारांचे प्रश्न मांडताना याकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशारा दिला.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारी
ऑगस्ट २०२० पासून किमान वेतन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही.
पगारातून कपात करूनदेखील भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा केलेली नाही
सेवा पुस्तके अद्ययावत केलेल्या नाहीत
तुटपुंजा असतानाही पगार वेळेवर दिला जात नाही
५ ते ७ वर्षे काम करूनदेखील नोकरीत कायम केलेले नाही
कामगारांना हक्काच्या व आजारपणाच्या रजा मिळत नाहीत
कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीकडून दिलेला नाही
०३०९२०२१-कोल-कामगार मोर्चा
फोटो ओळ: कोल्हापुरात शुक्रवारी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्यानेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महावीर उद्यान येथून जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधले.
(छाया : नसीर अत्तार)