स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा रद्द, केवळ ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 PM2020-08-13T17:00:24+5:302020-08-13T17:06:45+5:30
कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका वाढल्याने येत्या शनिवारी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्याचे सुधारित आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. ऑनलाईन, व्हर्च्युअल स्वरूपात घेतल्यास काही हरकत नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजवरच्या इतिहासात हा स्वातंत्र्यदिन गावगाड्यात ग्रामसभांच्या गदारोळाविना शांत शांत जाणार आहे.
कोल्हापूर : कोरोनाचा समूह संसर्गाचा धोका वाढल्याने येत्या शनिवारी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्याचे सुधारित आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. ऑनलाईन, व्हर्च्युअल स्वरूपात घेतल्यास काही हरकत नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजवरच्या इतिहासात हा स्वातंत्र्यदिन गावगाड्यात ग्रामसभांच्या गदारोळाविना शांत शांत जाणार आहे.
ध्वजारोहण झाले की ग्रामसभाचा आखाडा गरजण्यास सुरुवात व्हायची. दरवर्षी गावागावांत दिसणारा माहौल यावर्षी अजिबात दिसणार नाही. ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षातून सहा वेळा ग्रामसभा बोलावता येतात. या सभेत सुसंवादापेक्षा वादच जास्त झडू लागल्याने ही संख्या तीन वर आणण्यात आली.
जास्तीच्या सभा बोलावता येतात; पण स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या तीन वेळेला सक्तीने ग्रामसभा घ्याव्याच लागतात. ग्रामसभा हीच आमसभा असल्याने तिला गावपातळीवर सर्वाधिकार असतात. यावर्षी तर १४ व्या वित्त आयोगातील निधी खर्चासह येणाऱ्या १५ व्या वित्त आयोगातील निधीतून संभाव्य कामांचा कृती आराखडा तयार केला जाणार होता; पण कोरोनाने या सर्व नियोजनावर पाणी फिरवले आहे.
ध्वजारोहणासाठी मार्गदर्शक सूचना
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती झाल्यामुळे तेथे ध्वजारोहण कुणी करायचे याच्या मार्गदर्शक सूचना ग्रामविकासने जारी केल्या आहेत. त्यानुसार पहिला मान स्वातंत्र्यसैनिक यांना देण्यात आला आहे. ते नसतील तर तंटामुक्त अध्यक्षाला मान दिला जाणार आहे. तेही नसतील तर ग्रामसेवकाने ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडावयाची आहे.