रेंदाळमधील जागेचा निर्णय ग्रामसभेत घेणार
By admin | Published: October 9, 2015 12:12 AM2015-10-09T00:12:02+5:302015-10-09T00:38:13+5:30
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक : केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रासाठी जादा संपादन
हुपरी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे नियोजित केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रासाठी संपादित करण्यात येत असलेल्या शासकीय गायरानबाबत चर्चा करून जनमत जाणून घेण्यासाठी तहसीलदार दीपक शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये काहींनी अनुकूलता दर्शविली, तर बहुतांश जणांनी शासकीय गायरान गावठाण वाढीसाठीच आरक्षित करावे, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे याप्रश्नी ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये खास गावसभा घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. रेंदाळ येथील गट नंबर ९८५ मध्ये सुमारे दीडशे एकर शासकीय गायरान अस्तिवात आहे. याच गायरानातून दूधगंगा धरणाचा कालवा गेल्याने खुदाईमध्ये साधारण ४० एकर जमीन गेल्याने शंभरभर एकर जमीन शिल्लक राहिली आहे. या जमिनी व्यतिरिक्त भविष्यातील गावठाणवाढ करण्यासाठी दुसरी जागाच शिल्लक नाही, अशी वस्तुस्थिती असतानांही याच गायरानातील सर्वच जागा नियोजित ‘केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रासाठी’ संपादित करण्याचा घाट जिल्हा प्रशासनाने घातला आहे.
याप्रश्नी शासनाची भूमिका समजावून सांगण्यासाठी तहसीलदार दीपक शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची खास बैठक घेऊन शासनाचा निर्णय सांगितला.
यावेळी सरपंच अश्विनी कांबळे, उपसरपंच अभिषेक पाटील, पंचायत समितीचे सदस्य शिवाजी पुजारी, माजी सरपंच शिवाजी पाटील, अॅड. महिपती पाटील, राजू नाईक, कृष्णात पुजारी, शिवाजी गावडे, प्रकाश केळीकर, राजेंद्र कोल्हापुरे, संजय शिंगाडे, महेश कोरवी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
काहींची अनुकूलता,
तर काहींचा विरोध
काहींनी शासनाच्या निर्णयाला अनुकूलता दर्शविली, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. गोंधळामुळे याप्रश्नी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये खास गावसभा बोलावून ग्रामस्थांची भूमिका समजावून घेण्याचे ठरविले. तसेच तोपर्यंतच्या कालावधीमध्ये गट नंबर ९८५ची मोजणी करून घेऊन त्यासाठी शासकीय गायरान किती आहे. याची खात्री करून घेण्याचेही ठरविण्यात आले.