ग्रामसेवक कांबळेचे सोमवारी निलंबन, जिल्हा परिषदेला ‘लाचलुचपत’चा अहवाल प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:29 AM2019-01-19T11:29:33+5:302019-01-19T11:30:39+5:30
पट्टणकोडोली येथे लाच घेताना पकडण्यात आलेला ग्रामसेवक संभा शंकर कांबळे याच्यावरील गुन्ह्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला.
कोल्हापूर : पट्टणकोडोली येथे लाच घेताना पकडण्यात आलेला ग्रामसेवक संभा शंकर कांबळे याच्यावरील गुन्ह्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला.
एलईडी बसविण्याच्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना कांबळे याला मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले होते. याच बिलासाठी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनीही दहा हजार रुपये मागितल्याचे चौकशीत पुढे आल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर धरणगुत्तीकर कार्यालयात आलेले नाहीत. त्यांनी जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
‘लाचलुचपत’चा अहवाल आल्याने शनिवारी कांबळे याच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे चार दिवस रजेवर असून ते सोमवारी (दि. २१) कार्यालयात उपस्थित होणार आहेत. त्यामुळे मित्तल यांच्या सहीनंतर निलंबनाचे आदेश काढण्यात येतील. मात्र धरणगुत्तीकर अजूनही पसार आहेत. ते जामिनासाठी प्रयत्न करीत असले तरी अशा प्रकरणामध्ये तो मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.