नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार- पालकमंत्र्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 02:10 PM2020-10-19T14:10:05+5:302020-10-19T14:13:35+5:30
rain, farmar, satejpatil, minister, kolhapurnews अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोवाड : अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्र्यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, कालकुंद्री, हुंदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी कोवाड येथे बैठक घेतली. बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील पिकांचे नुकसान आणि पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री म्हणाले, ३० आॅक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा. त्याबाबत शेतकऱ्यांना आदल्यादिवशी निरोप द्या, गावांमध्ये दवंडी द्या. भरपाई देण्यासाठी शासन पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सहकार्य करावे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, संभाजी देसाई, अशोकराव देसाई, दुंडगे सरपंच राजेंद्र पाटील, कल्लाप्पा भोगण, अरुण सुतार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोदरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम आदी उपस्थित होते.
पडलेला ऊस आधी गाळा
शेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही संबंधित कारखान्याना पाठवावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
शेतकरी महिलेशी संवाद
भाताचे नुकसान झालेल्या कर्यात भागातील रुक्मिणी गोविंद गिरी या शेतकरी महिलेशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या दुसऱ्याचे शेत कसायला घेतले होते. पावसामुळे संबंध पीक वाया गेले. काळजी करु नका, सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा पालकमंत्र्यांनी त्यांना दिला.
पुलाबाबत लवकरच बैठक
दुंडगे आणि कुदनूरला जोडणाऱ्या धोकादायक पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. संरक्षित कठडा नसल्याने झालेल्या दुर्घटनांची माहिती आमदार पाटील यांनी दिली. पुलासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली..