आजऱ्यात महाआघाडीची विजयी मिरवणूक
By admin | Published: May 26, 2016 12:39 AM2016-05-26T00:39:56+5:302016-05-26T00:40:12+5:30
तालुक्यातील तरूणाईचा झिंगाट जल्लोष
आजरा : आजरा साखर कारखाना निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा निकाल लागल्याने जल्लोष न करू शकलेल्या स्व. वसंतराव देसाई महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांची आजरा शहरातून सवाद्य जंगी मिरवणूक काढली. यावेळी तालुक्यातील तरुणाईने ‘झिंगाट’ होऊन जल्लोष केला.
विजयी उमेदवार व आघाडीचे नेते अशोकअण्णा चराटी, विष्णुपंत केसरकर, रवींद्र आपटे, राजेंद्र गड्यान्नावर, श्रीपतराव देसाई, अंकुश पाटील, रमेश रेडेकर, सदानंद व्हनबट्टे, बाबूराव कुंभार, तानाजी देसाई, आबुताहेर तकिलदार यांच्यासह सर्व उमेदवारांची उघड्या जीपमधून मिरवणुकीस व्यंकटराव हायस्कूल येथून सुरुवात झाली.
मिरवणुकीत आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, राजू पोतनीस, विकास बागडी, मुकुंदराव तानवडे, संदीप कांबळे, अरुण देसाई, नामदेव नार्वेकर, शामराव बोलके, डॉ. दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, विलास नाईक, निवृत्ती कांबळे, सरपंच शीला सावंत, अजित चराटी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीतनंतर बोलताना बाबूराव कुंभार म्हणाले, आजरा कारखाना गिळंकृत करण्याचा डाव सभासदांनी उधळून लावला आहे. यापुढे सभासदांच्या हिताचेच निर्णय होतील.
राजू गड्यान्नावर म्हणाले, आमदार मुश्रीफांसह सहकाराचे वाटोळे करणाऱ्या मंडळींना सभासदांनी दिलेली ही सणसणीत चपराक आहे. विष्णुपंत केसरकर म्हणाले, कोणतीही मोठी शक्ती सोबत नसताना केवळ सभासदांच्या विश्वासावर कारखाना जिंकला असून, त्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ दिला जाणार नाही.
अशोकअण्णा चराटी म्हणाले, आम्ही स्थानिक मंडळी कारखाना चालविण्यास सक्षम आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आता आपापल्या संस्था सांभाळाव्यात.
‘गोकुळ’चे संचालक व आघाडीचे नेते रवींद्र आपटे यांनी कारखाना सभासदांच्या हिताचेच निर्णय होतील. सभासदांच्या हिताला कदापिही बाधा पोहोचू देणार नाही, असे सांगितले. यावेळी अबुताहेर तकिलदार, निवृत्ती कांबळे, तानाजी देसाई यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)
आजरा साखर कारखाना निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर स्व. वसंतराव देसाई विकास आघाडीतर्फे बुधवारी विजयी मिरवणूक काढण्यात आली