दादा, सत्ता गेल्यावर कार्यकर्ते शोधाल
By admin | Published: January 9, 2017 01:04 AM2017-01-09T01:04:56+5:302017-01-09T01:04:56+5:30
हसन मुश्रीफ यांचा पलटवार : पक्ष सोडणाऱ्यांचे भले होणार असेल, तर त्यांना शुभेच्छा!
कोल्हापूर : गेली पंधरा-वीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रांत एकत्र काम केलेली जिवाभावाची माणसे पक्षातून गेल्याने दु:ख होऊन रात्रीची झोपही लागत नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. मात्र, भाजपची सत्ता गेल्यानंतर चंद्रकांतदादांना एक हजार वॅटचा बल्ब घेऊन कार्यकर्ते शोधावे लागतील, असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण इंगवले यांच्या भाजप प्रवेशावेळी शनिवारी (दि. ७) पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत, हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी संपली असून, मुश्रीफ यांची आता झोप उडाली, अशी बोचरी टीका केली होती. मंत्री पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षे संघटनेत काम
करणारी जिवाभावाची माणसे पक्ष सोडून गेल्याने दु:ख होते. पक्ष सोडून त्यांचे
भले होणार असेल तर त्यांना अडविण्याचा अधिकार आपणाला नाही, त्यांना
शुभेच्छा देतो.
शिवसेनेला ‘जातीयवादी’ म्हणून हिणवणाऱ्या मुश्रीफ यांना कागलमध्ये त्यांची मदत कशी चालते, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे. नगरपालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेबरोबर युती केलेली नाही. सुरुवातीच्या टप्प्यात संजय मंडलिक यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू होती; पण नंतर त्यांनी फारकत घेतल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जांभळे यांचे पद जाणारच!
कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढविली होती, त्याचे पुरावे न्यायालयात सादर करणार आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे यापूर्वीचे निकाल पाहिले तर एकत्रित निवडणूक लढविल्यास पक्षाला ‘व्हिप’ बजावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हणो; अशोक जांभळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे पद जाणार हे नक्की, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
सामान्य माणूसच
नाव पैलतीरी नेईल
सत्तेसाठी नेतेमंडळी पक्षातून बाजूला गेली असली तरी सामान्य माणूस आपल्यासोबत आहे. त्यामुळे हीच माणसे आमची नाव पैलतीरी निश्चित नेतील, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
‘राष्ट्रवादी-भाजप’ आघाडी झाल्यास आश्चर्य नको
कुरुंदवाड नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील व सुरेश हाळवणकर यांनी राष्ट्रवादीला आॅफर दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादी-भाजप अशी आघाडी झाली तर आश्चर्य नको, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.