कोल्हापूर : नातवाने घेतली वृध्दाश्रमात आजोबांची भेट, साऱ्यांसाठी आणले कपडे, घेतले सहभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 06:37 PM2018-11-14T18:37:53+5:302018-11-14T18:39:24+5:30
आपल्या नातेवाईकांच्या प्रतिक्षेत असलेल्या उर्वरित दोघांपैकी निपाणीतील एका आजोबांची त्यांच्या नातवाने बुधवारी घोसरवाड येथील जानकी वृध्दाश्रमात जाउन भेट तर घेतलीच, परंतु आजोबांसोबत सहभोजनही घेतले. लोकमतच्या वृत्तामुळे घोसरवाड येथील वृध्दाश्रमातील त्या चौघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश निर्माण झाला.
कोल्हापूर : आपल्या नातेवाईकांच्या प्रतिक्षेत असलेल्या उर्वरित दोघांपैकी निपाणीतील एका आजोबांची त्यांच्या नातवाने बुधवारी घोसरवाड येथील जानकी वृध्दाश्रमात जाउन भेट तर घेतलीच, परंतु आजोबांसोबत सहभोजनही घेतले. लोकमतच्या वृत्तामुळे घोसरवाड येथील वृध्दाश्रमातील त्या चौघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश निर्माण झाला.
शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे बाबासाहेब पुजारी हे जानकी वृद्धाश्रम चालवतात. धनगर समाजासाठी आपल्या जागेत लंगर चालवता चालवता वृध्दाश्रमही त्यांनी सुरु केला. या वृध्दाश्रमात सध्या २४ वेगवेगळ्या ठिकाणचे वृध्द आसरा घेत आहेत. ज्यांचे कोणी नाही, त्यांच्यासाठी हा वृध्दाश्रम म्हणजे वरदान आहे. ज्यांना घरचे कोणी पहात नाहीत, अशांनाही या आश्रमाचा आधार वाटतो आहे.
मायेच्या माणसांच्या भेटीच्या प्रतिक्षेत असलेल्या यातील चार वृध्दांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. लोकमतमध्ये मंगळवारी यासंबंधी प्रसिध्द झालेल्या वृत्तामुळे दोघांच्या नातेवाईकांनी घोसरवाड येथे जाउन त्यांच्या वडिलांची कुटूंबासह भेट घेतली होती. आणखी दोघांना त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्षा होती.
बुधवारी त्यांच्यापैकी निपाणी येथील वृध्दाच्या २३ वर्षीय नातवाने बातमी वाचून भेट घेतली. वडील येउ शकले नसले तरी नातवाने मात्र आपल्या आजोबांना आठवणीने कपडे, फराळ आणि भेटवस्तू आणल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी वृध्दाश्रमातील साऱ्यांसाठीच काहींना काही भेट आणली होती.
नातवाने आजींना साड्या तर आजोबांना पँट-शर्ट आणले.फराळही आणला. याशिवाय साºयांसोबत सहभोजनही केले. दिवसभर या वृध्दाश्रमात थांबून त्यांच्यासोबत गप्पागोष्टी केल्या.
लोकमतने फोडली वाचा
बाबासाहेब पुजारी आणि त्यांच्या बहिणीमार्फत हे वृध्दाश्रम चालविले जाते. परिसरातील लोक धान्याची व इतर सारी मदत करतात, परंतु आर्थिक मदतीअभावी कधीकधी गाडा अडतो. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी या वृध्दाश्रमासाठी मदत करावी, असे आवाहन पुजारी यांनी केले आहे. दरम्यान, रेंदाळचे सामाजिक कार्यकर्ते मोहन खोत यांनी लोकमतने या वृध्दांना मदत करण्यासाठी वाचा फोडली याबद्दल आभार मानले.