दादा माणूस..!
By Admin | Published: January 29, 2015 12:51 AM2015-01-29T00:51:21+5:302015-01-29T00:53:05+5:30
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा ‘डी.लिट्.’ पदवीने सन्मान करण्यात येत आहे. त्या निमित्ताने
शिवाजी विद्यापीठातर्फे आज, गुरुवारी दीक्षान्त समारंभात माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा ‘डी.लिट्.’ पदवीने सन्मान करण्यात येत आहे. त्या निमित्ताने या दादा माणसाच्या जीवनावर टाकलेला दृष्टिक्षेप....
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
कसबा बावड्यातील खानदानी शेतकरी कुटुंबातील मुलगा ते बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याचे राज्यपाल, हा अभिमान वाटेल असाच प्रवास आहे डॉ. डी. वाय. पाटील यांचा. एखाद्याचा बहुआयामी विकास कसा होतो, याचे महाराष्ट्रातील उत्तम उदाहरण म्हणून त्यांचे नाव प्राधान्याने घेता येईल. शेतीची उत्तम जाण, कुस्तीची आवड, बावड्यातील राम सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम, दोनवेळा आमदार, काळम्मावाडी धरण व्हावे, यासाठीच्या लढ्यात संघर्ष, राज्यात विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी त्यांनी १९६४ला कसबा बावडा शिक्षण मंडळाचे आणि नंतर १९७५ला गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे अध्यक्षपद
भूषविले.
एका टप्प्यावर सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातच कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि आज एका मोठ्या शैक्षणिक साम्राज्याचे ते सर्वेसर्वा आहेत. १९८०च्या सुमारास राजकारणातून बाजूला झालेला हा माणूस २००९मध्ये पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला आणि त्यांना त्रिपुरा व बिहारचे राज्यपाल होण्याची संधी मिळाली.
करवीर तालुक्यातील कसबा बावडा येथील वारकरी सांप्रदायातील सधन शेतकरी यशवंतराव भाऊराव पाटील यांच्यापोटी २२ आॅक्टोबर १९३५ ला त्यांचा जन्म झाला. दादांच्या आई वत्सलाबाई; परंतु त्यांच्या मायेचे छत्र त्यांना फार काळ लाभले नाही. वयाच्या सातव्या वर्षीच ते आईला पोरके झाले. वडिलांनी त्यांना मायेचा आधार दिलाच; परंतु दादांच्या वयाच्या १९व्या वर्षी त्यांचेही निधन झाले. दादा सांगतात, मला सुनंदा मावशी व सुला मावशी यांचे फार प्रेम मिळाले. सुनंदा मावशीला तर मी आईच म्हणत होतो. अंबप हे माझ्या मामाचे गाव. अंबपचेही माझ्या वाटचालीत मोठे योगदान आहे. कौटुंबिक परिस्थिती चांगली, तर शेती भरपूर होती. त्यामुळे मला वडिलांनी चांगले शिक्षण दिले. त्यांच्या विचाराचा, वागणुकीचा प्रभाव माझ्या जीवनावर दाट आहे. त्यांनी आयुष्याला शिस्त लावली. त्या काळात कॉलेजला जाताना मोटारसायकल सहज घेऊ शकलो असतो; पण मी सायकलच वापरली. वडिलांनी कष्टाची सवय लावली. तालमीत घातले. व्यायामाची सवय लावली. शेतात भांगलण केली. हातात नांगर धरला. उसाला पाणी पाजले. गुऱ्हाळावरही काम केले.
वडिलांची इच्छा मी बॅरिस्टर किंवा आयसीएस व्हावे, अशी होती. त्यावेळी आयएएसची परीक्षा नव्हती. त्यांचे शिक्षण फार कमी होते; परंतु वावर उत्तम शिकलेल्या लोकांत होता. आयुष्याला वडिलांकडून प्रेरणा मिळाली. दादांना १९५५ मध्येच कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटीचे चेअरमन होण्याची संधी मिळाली. तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेत १९५७ मध्ये ते काँग्रेसचे नगरसेवक झाले. राज्यातील तत्कालीन जाणते नेते राजारामबापू पाटील यांच्याशी दादांचा १९५९ मध्ये परिचय झाला. मग बापूंच्या नेतृत्वाखाली दादा काम करू लागले. दादांचे सारे काम व संपर्कही करवीर तालुक्यात असताना त्यांना १९६७ला काँग्रेसने पन्हाळा-बावडा मतदारसंघातून विधानसभेला उमेदवारी दिली. जनतेने दादांना सलग दोनवेळा विधानसभेत पाठविले. त्यानंतर ते दोनवेळा ‘करवीर’मधून निवडणुकीस उभे राहिले; परंतु जिल्ह्याच्या राजकारणातील कुरघोडी, स्वपक्षियांतील जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेला दगा, अशा काही कारणांमुळे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसशी एकनिष्ठ दादा त्याच काँग्रेसला वैतागून व राजारामबापूंच्या प्रेमापोटी तत्कालीन जनता पक्षातही गेले. विधानसभेची एक निवडणूक त्यांनी या पक्षातर्फे लढवलीही; परंतु दीड वर्षांत ते स्वगृही काँग्रेसमध्ये परतले. लोकांसाठी मनापासून झटूनही पराभव झाल्याने त्यांना धक्का बसला. दादांच्या मनात राजकारणातून बाजूला होण्याच्या निर्णयाची बिजे तिथेच रुजली.
त्यातच एक-दोन वर्षे गेली आणि १९८३ साल उजाडले. महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वात या वर्षाचे वेगळे महत्त्व आहे. यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विनाअनुदानित तत्त्वावर मेडिकल आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला. पाटील यांच्या पुढाकाराने मुंबईत स्थापन झालेल्या रामराव
आदिक एज्युकेशन संस्थेतर्फे मुंबईत पहिले
मेडिकल कॉलेज सुरू झाले. त्या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. मुंबईसह पुणे, कोल्हापूर येथे डी. वाय. पाटील शिक्षणसमूहाचा पसारा एवढा वाढला आहे की, त्याची मोजदाद करणेही अशक्य व्हावे. स्वत: पाटील यांच्या नावे तीन विद्यापीठे आहेत.
दादांनी राजकारणास योग्यवेळी सोडचिठ्ठी देऊन शैक्षणिक कार्यात लक्ष घातले. म्हणून एवढे चांगले संस्थांचे जाळे ते उभे करू शकले. आज मागे वळून पाहताना राजकारण लवकर सोडण्याचा निर्णय चुकीचा होता का? असे त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘कोणताही निर्णय हा त्या काळाचे अपत्य असते. त्या प्राप्त परिस्थितीत जे योग्य वाटले त्यानुसार आपणच घेतलेला तो निर्णय असतो. त्यामुळे त्याबद्दल नंतर किंवा आता पश्चाताप करण्यात अर्थ नसतो आणि मला तसा पश्चातापही वाटत नाही. मी जे केले ते अगदी सहजतेने व बरोबरच होते, असेही काळाच्या कसोटीवर सिद्ध झाल्याचे समाधान आज मला आहे.’’
पाटील यांचे कौटुंबिक जीवनही समृद्ध
आणि समाधानी आहे. मुले कर्तृत्ववान निघाली याचे त्यांना खूप कौतुक वाटते. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील राजकारणात स्थिरावले आहेत, तर संजय पाटील कोल्हापूरच्या संस्थांचा व्याप सांभाळत आहेत. मुंबईतील संस्थांची जबाबदारी विजय पाटील आणि अजिंक्य पाटील सक्षमपणे पाहत आहेत.