आजी-माजी नगरसेवक पक्ष बदलण्याच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:57+5:302021-01-13T04:58:57+5:30
कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना काही आजी-माजी नगरसेवकांनी थेट पक्ष बदलण्याचा पवित्रा घेतला आहे. कोणी पाच वर्षांमध्ये ...
कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना काही आजी-माजी नगरसेवकांनी थेट पक्ष बदलण्याचा पवित्रा घेतला आहे. कोणी पाच वर्षांमध्ये निधी मिळाला नसल्यामुळे तर कोणी सापत्निक वागणूक आणि माेठी पदे मिळाली नसल्यामुळे नाराजीतून हा निर्णय घेतला आहे. परिणामी तगडे उमेदवार गळाला लागत असल्यामुळे नेत्यांनीही त्यांना पक्षात घेण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे समजते.
राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता असल्यामुळे साहजिकच अनेकांचा पहिली पसंती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे असल्याचे सध्या तरी चित्र आहे. प्रत्येक प्रभागात सात ते आठ नगरसेवक महाविकास आघाडीसाठी फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत. एकीकडे असे असतानाच दुसरीकडे आजी-माजी नगरसेवकच थेट पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत तशी त्यांनी फिल्डिंगही लावली आहे. तगडे उमेदवार मिळत असल्यामुळे नेत्यांनीही त्यांना पायघड्या घातल्याचे समजते. यामधील एका कारभाऱ्याने दुसऱ्या पक्षातून कामही सुरू केले आहे. महापालिकेवर विरोधी आघाडीची जास्तीत जास्त नगरसेवक आणण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखल्याचेही समजते.
चौकट
आठ ते दहा नगरसेवक फुटण्याची शक्यता
गेल्या सभागृहातील आठ ते दहा नगरसेवक फुटण्याची शक्यता आहे. यामधील काही काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ताराराणी आघाडीवर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांपैकी चार वर्ष राज्यात भाजप सत्तेवर होती. स्वत:च्या प्रभागांसाठी अपेक्षित निधी मिळाला नसल्याची खदखद नाराजांमध्ये आहे तर सत्तेवर असूनही पदे मिळाली नाहीत. कारभाऱ्यांनी स्वहित पाहल्याची खदखद काँग्रेस-राष्ट्रवादीमधील काहींमध्ये आहे. भाजप, ताराराणी आघाडीने अशा नाराजांना गळाला लावण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. दुसऱ्या पक्षात जाण्यापासून रोखणे दोन्ही आघाडीच्या नेत्यांना आव्हान ठरणार आहे.
चौक़ट
गतसभागृहातील पक्षीय बलाबल
काँग्रेस (अपक्षासह) ३०
राष्ट्रवादी १४
भाजप १४
ताराराणी आघाडी १९
शिवसेना ४
एकूण ८१
चौकट
विरोधातील नगरसेवकांना घेतल्यास पक्षात बंडखोरीचा धोका
आजी-माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात असून नेत्यांनी त्यांना तगडा उमेदवार म्हणून पक्षाची उमेदवारी दिल्यास त्या प्रभागातील मूळचे पक्षातील इच्छुक नाराज होण्याचा धोका आहे. त्यांच्याकडून बंडखोरी होण्याचा शक्यता आहे. हे बंडखोर कोणत्या पक्षात जाणार त्यावर तेथील निकाल अवलंबून राहणार आहे. आजी-माजी नगरसेवकाचा प्रवेश पथ्यावर पडणार की तोट्यात जाणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार