कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हजार कामगारांना अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:00 AM2017-11-28T00:00:13+5:302017-11-28T00:03:24+5:30
दत्तात्रय पाटील ।
म्हाकवे : राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाºया आणि शासन दरबारी नोंदीत असणाºया कामगारांना त्यांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर आता या कामगारांच्या आरोग्याची सुरक्षा राहावी यासाठी त्यांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) पुरविण्यात येणार आहे.
बांधकाम कामगारांना कोणतीही दुखापत अथवा जीवितहानी होऊ नये यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने बांधकाम कामगार वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा संचामध्ये हेल्मेट, सुरक्षा जॅकेट, हॅँडग्लोज, आदींचा समावेश आहे.महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सुमारे तीन लाख बांधकाम कामगार नोंदीत आहेत.
यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात ६० हजार कामगार नोंदीत आहेत. या कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान वाटप थेट त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शासन स्तरावरून मंजूर होणाºया विकासकामांच्या निधीपैकी एक टक्का निधी या कामगार मंडळाकडे वर्ग होतो. सध्या मंडळाकडे कोट्यवधीचा निधी जमा आहे. त्यामुळे या निधीतून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाल बावटा कामगार संघटनेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १६ वेळा आंदोलने, मोर्चे काढले.
गवंडी, सुतार, लोहार, फरशी पॉलिश, फरशी कटिंग, प्लंबर, सेंट्रिंग यासह त्यांच्यासोबत असणारे मजूर यांची शासनाकडे नोंद झाली आहे. या कामगारांना आरोग्य विमा योजना, साहित्य खरेदी अनुदान, त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षणासाठी अनुदान, महिला कामगारांना डिलिव्हरीसाठी अनुदान देण्याच्या योजना शासनाने राबविल्या आहेत.
मात्र, २०१४ पासून या कामगारांसाठी एकाही योजनेचा प्रत्यक्ष लाभ शासनाने दिलेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून या कामगारांनी जिल्हाधिकाºयांसह पालकमंत्र्यांचे निवासस्थान, मंत्रालय, कामगार आयुक्त, विविध अधिवेशनामध्ये तसेच राज्यव्यापी रास्ता रोको करून शासनविरोधात बंड पुकारले. गेल्या दोन वर्षांत या कामगारांनी तब्बल १६ वेळा आंदोलने केली. या संघर्षाचे फलित म्हणून या कामगारांना साहित्य खरेदीसाठी पाच हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाला घेणे भाग पडले.
कुटुंबातील एकालाच लाभ
सलग तीन वर्षे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असणाºया कामगारांनाच साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजारांचा लाभ देण्यात येणार आहे. या अनुदानातून संंबंधित कामगारांनी त्यांना आवश्यक खोरे, टिकाव, पाटी, हातोडा, बूट, थापी, सडा, आदी साहित्य खरेदी करावयाचे आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया कामगार आयुक्त कार्यालयातून सुरू झाली आहे.
‘मेडिक्लेम’ योजना सुरू करा : लाल बावटा
कामगारांना साहित्य खरेदीसाठी अनुदान आणि सुरक्षा संच देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु हा निर्णय म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्याचाच प्रकार आहे. बांधकाम कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाला ‘कवचकुंडले’ वाटणारी ‘मेडिक्लेम’ योजना भाजप सरकारने बंद केली आहे. त्यामुळे मेडिक्लेम योजना पूर्ववत करण्यासाठी बांधकाम कामगार आंदोलन उभे करणार आहे, अशी प्रतिक्रिया लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे व जिल्हा सचिव शिवाजीराव मगदूम-सिद्धनेर्लीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.