ग्रामीण नळ योजना वीज बिलात सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:43+5:302021-03-19T04:22:43+5:30
जयसिंगपूर : राज्य शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत कृषी पंप वीजधारकांना वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेतला, त्याचे महाराष्ट्रात स्वागत झाले ...
जयसिंगपूर : राज्य शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत कृषी पंप वीजधारकांना वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेतला, त्याचे महाराष्ट्रात स्वागत झाले आहे. त्याच धर्तीवर अडचणीत असलेल्या ग्रामपंचायतींना बळ देण्यासाठी ग्रामीण नळ पाणी पुरवठा वीज बिलांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री राऊत यांनी दिल्याचेही यड्रावकर यांनी सांगितले.
कोरोना महामारी, महापूर, परतीच्या पावसाचा तडाखा अशा नैसर्गिक आपत्यांमुळे शहरी भागासह ग्रामीण भागाचीदेखील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. याचा परिणाम ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर होताना दिसत आहे. अशातच नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांमुळे विद्युत वितरण कंपनीकडून या योजनांचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना पिण्याचे पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडित करणे तातडीने थांबविण्याची गरज आहे. यासाठी ऊर्जामंत्र्यांना साकडे घालण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.