गोवा, कर्नाटकच्या धर्तीवर अनुदान द्या
By admin | Published: December 7, 2015 12:41 AM2015-12-07T00:41:18+5:302015-12-07T00:42:07+5:30
उत्पादक शेतकऱ्यांची मागणी : ‘गोकुळ’च्या दरकपातीमुळे झटका
कोल्हापूर : गायीचे दूध अतिरक्त झाल्याने ‘गोकुळ’च्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. याचा उत्पादकांना चांगलाच झटका बसला आहे. अगोदरच दूध व्यवसाय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पशुखाद्य व वैरणीचे वाढलेले दर व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दूध संघाने दिलेला झटका उत्पादकांना सोसणारा नाही. यासाठी गोवा व कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये थेट उत्पादकांच्या नावावर अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
साखरेचे कोसळलेले दर व त्यातून साखर व्यवसायासमोर निर्माण झालेली अनिश्चितता, अशा परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था सांभाळण्याचे काम दूध व्यवसाय करीत आहे.
दहा दिवसाला दुधाचे पैसे हातात येत असल्याने संसाराचा गाडा पुढे हाकण्यास मदत होते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी म्हैस दुधाच्या तुलनेत गायीचे दूध फारच कमी होते. गायीच्या दुधाला दर कमी मिळत असल्याने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत होता. मात्र, अलीकडील काळात म्हैशीच्या दुधाची मागणी वाढल्याने दूध पावडरसाठी गायीचे दूध मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. त्यामुळे गायीच्या दूध दरात वाढ होत गेली.
गेल्या वर्षभरात स्थानिक बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर घसरल्याने दूध संघांपुढे पेच निर्माण झाला आहे. मध्यंतरी काही दूध संघांनी गायीचे दूध स्वीकारण्यास नकार दिला होता.
‘गोकुळ’ या दूध संघाकडे सध्या १२ लाख ३२ हजार लिटर दूधाचे संकलन होते. त्यापैकी ५ लाख ५१ हजार लिटर गायीचे दूध आहे.
‘गोकुळ’ ला रोज दोन लाख लिटर दुधाची पावडर करावी लागते. सध्या बाजारात १४० ते १४५ रुपये असा दूध पावडरीचा दर आहे. गायीच्या दुधाला प्रति लिटर २३ रुपये ५० पैसे उत्पादकांना द्यावे लागतात. उत्पादकांना द्यावयाचा दर व पावडरचे दर पाहता मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी गायीचा दूध दर दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध संघाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने कदाचित हा निर्णय योग्य असेल; पण उत्पादकांचा विचार कोण करणार? हा प्रश्न आहे. पशुखाद्याचे दर, दुष्काळाची पार्श्वभूमी यामुळे हा व्यवसाय अडचणीत असताना दुधाचे दर कमी केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
गोवा राज्यात गायीच्या दूधाला राज्य सरकार थेट प्रतिलिटर सात रुपये अनुदान, तर कर्नाटकात चार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही गायीच्या दुधाला अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
मुळात दूध व्यवसाय अडचणीत आला असताना ‘गोकुळ’ने दर कपातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना झटका दिला आहे. तोट्याचे कारण सांगून दर कमी करण्यासारखी सध्याची परिस्थिती नाही. - भरत वातकर,
दूध उत्पादक, सांगरूळ
गायीचे दूध वाढले आहे. त्यात दूध पावडरला दर नसल्याने संघाचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे. संघाची आर्थिक घडी विस्कटू नये, यासाठी संचालक मंडळाला हा निर्णय घ्यावा लागला.
- अरुण नरके,
ज्येष्ठ संचालक, गोकुळ दूध संघ