पीएचडी करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, संशोधक विद्यार्थ्यांची मागणी
By पोपट केशव पवार | Published: October 30, 2023 03:56 PM2023-10-30T15:56:43+5:302023-10-30T15:58:24+5:30
सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण
कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या अवघ्या २०० संशोधक विद्यार्थ्यांना फिलोशीप देण्यात येणार आहे. २०२३ साठी १४०० विद्यार्थी पात्र आहेत. उर्वरित १२०० विद्यार्थ्यांनी कशी पी.एचडी करायची? समाजाची लोकसंख्या जास्त असूनही विद्यार्थ्यांची संख्या कमी केली आहे. सरकारने समाजातील संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फिलोशीप द्या या मागणीसाठी कोल्हापूर विभागातील कुणबी-मराठा संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारपासून कोल्हापूर विभागीय सारथी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले.
मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे राज्यात शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मराठा समाज मागास होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने २०१९ पासून पी. एच. डी. करणाऱ्या होतकरू गरीब कुणबी-मराठा विद्यार्थांना सारथीकडून फेलोशिप देण्यास सुरुवात झाली. २०१९ ते २०२१ या कालावधीत सरसकट फेलोशिप दिली.पण मागील दोन वर्षातील म्हणजे २०२२ ते २०२३ मधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यातच १ जानेवारी२०२३ रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सारथीअंतर्गत दरवर्षी फक्त ५० विद्यार्थ्याना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला.
याप्रश्नावर आंदोलन केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत २०० जागा करण्यात आल्या. या फिलोशीपसाठी १३१२ पात्र विद्यार्थ्यांमधून केवळ २०० विद्यार्थी सीईटी परीक्षेद्वारे घेण्यात येण्याचे जाहीर केले. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घेऊन २०२३ साठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी सरसकट निवड करा, बार्टी, टीआरटीआय या संस्थेप्रमाणे सारथीच्या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठातील पी.एचडी नोंदणी दिनांकपासून फेलोशिपचालाभ द्या अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबत निर्णय न घेतल्यास मराठा समाज व समाजातील संशोधक विद्यार्थीतीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.