साखर निर्यातीसाठी दोन दिवसांत अनुदान
By Admin | Published: February 9, 2015 01:01 AM2015-02-09T01:01:19+5:302015-02-09T01:16:15+5:30
सहकारमंत्र्यांची माहिती : प्रभाकर देशमुख यांचे आंदोलन स्थगित
कोल्हापूर : साखर निर्यातीसाठी प्रतिटन चार हजार रुपये अनुदान येत्या दोन दिवसांत कारखान्यांंना देणार असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या अनुदानाबाबत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करुन त्यांची मान्यता मिळाली आहे. मंत्री पाटील यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करत असल्याचे प्रभाकर भैया देशमुख यांनी सांगितले. चालू गळीत हंगामातील उसाला एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने कर्जे व्याजाने फुगली आहेत. कापूस उत्पादकांप्रमाणे ऊस उत्पादकही आत्महत्या सुरू करतील. यासाठी केंद्र सरकारने देऊ केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री पाटील यांच्या दारात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर मंत्री पाटील व देशमुख यांच्यात रविवारी चर्चा झाली. साखरेचे दर घसरल्याने हा पेच निर्माण झाला आहे, परिणामी राज्य बँकेकडून कारखान्यांना कमी उचल मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांकडे पैसे नाहीत. जागतिक बाजारपेठेतही साखरेचे दर कमी आहेत, यासाठी निर्यात अनुदान देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. त्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मान्यता मिळाली असून येत्या दोन दिवसांत टनाला चार हजार रुपये अनुदान कारखान्यांना मिळणार आहे. त्यामुळे क्विंटलमागे चारशे रुपये जादा मिळणार असल्याने एफआरपी देण्यास मदत होणार आहे. तुमच्याप्रमाणे आम्हालाही शेतकऱ्यांची स्थिती समजते, सरकारचा गाडा रुळावर आणण्यासाठी मुख्यमंत्री २३ तास काम करतात, आंदोलन करू नका, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. बबु्रवान गोरे, संदीप देशमुख, पप्पू पाटील, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
ठिय्या मारणार
सरकार काहीच करत नसेल तर आंदोलन करा, पण प्रयत्न सुरू असताना आंदोलन करू नका. माझ्या घरासमोर ठिय्या मारणार असाल तर मी मुंबईला जात नाही, घरीच थांबतो, असे मंत्री पाटील यांनी देशमुख सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले.