प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, अन्यथा राज्यभर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:23 AM2021-04-22T04:23:04+5:302021-04-22T04:23:04+5:30
कोल्हापूर : सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील सर्व शिक्षकांच्यावतीने आमदारांच्या दारात ...
कोल्हापूर : सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील सर्व शिक्षकांच्यावतीने आमदारांच्या दारात दि. १ मे रोजी ठिय्या आणि घंटानाद आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन प्राथमिक स्वरूपाचे इशारा आंदोलन असणार आहे. त्यादिवशी पुढील आंदोलनाचे नियोजन करण्यात येईल, असे राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
अनुदानाच्या मागणीचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील यांना दि. १४ एप्रिल रोजी बिंदू चौक येथे दिले. शालेय शिक्षण विभाग हा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे तुम्ही ठरवले, तर प्रचलित नियमानुसार अनुदान नक्कीच मिळेल. या प्रचलित नियमानुसार अनुदानाच्या निर्णयाबाबत तुम्ही शब्द दिला होता. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. त्यावर अनुदानाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, कृती समितीचे प्रकाश पाटील, गजानन काटकर, पांडुरंग पाटील, रामराजे सुतार, आदी उपस्थित होते.
चौकट
शिक्षकांना न्याय द्यावा
जूनपासून प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबतचा निर्णय घ्यावा. त्यासाठी शासन निर्णयातील सरसकट हा शब्द काढून त्याठिकाणी प्रचलित नियमानुसार अनुदान हा शब्द घालणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन गेल्या वीस वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जगदाळे यांनी केली.